नांदेड – सरकार खरोखर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे काय ? असा प्रश्न , आणि शंका उपस्थित करणारे वक्तव्य आज राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी येथे केले ,त्याच बरोबर शेतकऱ्याला कर्जमाफिसोबत आता नव्याने शून्य टक्के व्याजाने ३ लाखाचे कर्ज द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी च्या वतीने केली आहे
मराठवाडा दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधला
यावेळी अजित पवार म्हणाले , राज्य सरकारने चार दिवसांपूर्वी जी कर्जमाफी केली त्याबाबत एक जीआर काढला आहे. या जीआरनुसार सरकारने अनेक निकष लावलेले दिसत आहेत. बँका कोणते निकष तपासणार, बँका कसं पाहणार, ते काम सरकारमधील लोकांचं असतं. सरकारच्या मनात काय आहे तेच स्पष्ट होत नाही. कर्जमाफीबाबत काही नियम व अटी घातल्या आहेत, त्याबाबत दुमत नाही. सरकारी नोकरी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, शेतकऱ्याची राजकीय पार्श्वभूमी असेल तर त्याला कर्जमाफी देणार नाही, अशा अटी आहेत त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहन असेल ते कर्जमाफीसाठी पात्र ठरणार नाही? आधीच शेतकऱ्यांकडे बैलांची कमतरता आहे म्हणून अनेक शेतकरी ट्रॅक्टर वापरतात, असे असंख्य शेतकरी आहेत, ते कर्जमाफीपासून वंचित राहतील. सरकारच्या या निकषामुळे सरकार एखादा डाव तर आखत नाही ना अशी शंका येते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्पष्ट मागणी आहे की शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज द्यावं, ज्याच्या आधारावर तो त्याच्या पेरणीच्या कामाला लागेल. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. निव्वळ धुळफेक सुरु आहे. ही बाब आम्ही सहन करणार नाही. कर्जमाफीचं यश पूर्णतः शेतकऱ्यांचं आहे. मुख्यमंत्री मध्यावधी निवडणुकांची भाषा करतात, शिवसेना मध्यावधीची भाषा करते. यांच्याकडे पूर्ण बहुमत असताना हे लोक असं का म्हणतात, तेच कळत नाही. यांना आपल्या मित्रपक्षाबाबत शंका आहे की त्यांचा त्रास होतो तेच कळत नाही.