रासपतर्फे शाहूनगरी-मुंबापुरी ‘अहिल्यादेवी विचार यात्रा’ ‘अहिल्यादेवी जयंती सोहळा’ या वर्षीपासून मुंबईमध्ये
पुणे :
महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 291 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शाहूनगरी ते मुंबापुरी मार्गे अहिल्यादेवी रथयात्रेचे आयोजन केले आहे. शुक्रवार 20 मे रोजी सकाळी 9 वाजता कोल्हापूर, दसरा चौक येथून या अहिल्यादेवी विचार रथयात्रेची सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्रदेश सचिव डॉ. उज्ज्वला हाके, पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे आणि प्रसिद्धीप्रमुख सुरज खोमणे यांनी दिली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे सचिव दशरथ राऊत यांनी या रथयात्रेचे आयोजन केले आहे. गेल्या 20 ते 22 वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चवडी येथे साजरी केली जात आहे. परंतु रासपचे नेते महादेव जानकर यांनी या वर्षीपासून अहिल्यादेवी होळकर जयंती मुंबई येथे साजरी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सलग 11 दिवस चालणार्या या अहिल्यादेवी विचार रथयात्रेचा मंगळवार 31 मे 2016 रोजी मुंबई येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी समारोप करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील रासप कार्यकर्ते या जयंतीच्या तयारीला लागले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला व्हावी या उद्देशाने ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने केंद्रीय सचिव दशरथ राऊत यांनी महाराष्ट्र दौर्याचे आयोजन केले आहे. 20 मे रोजी कोल्हापूर दसरा चौक येथून सुरू होणारी ही विचार रथयात्रा सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, विदर्भामार्गे फिरून 31 मे रोजी मुंबई दाखल होणार आहे. तरी रासपच्या सर्व कार्यकर्त्यांनी 20 मे रोजी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.