पुढील दशकात वापरल्या जाणाऱ्या २२५ मॅक्स विमानांपैकीचे ‘जेट एअरवेज’चे हे पहिले विमान
मुंबई : भारतामधील एक आघाडीची आंतरराष्ट्रीय हवाईसेवा पुरविणाऱ्या कंपनीने आज आपल्या ताफ्यात ‘बोईंग ७३७ मॅक्स’ हे नवीन विमान दाखल झाल्याची घोषणा केली. या विमानामुळे हवाई प्रवाशांना उत्तम आणि वेगळ्या प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ हे नवीन विमान म्हणजे ‘आयल ७३७’ विमानांचे ‘अपग्रेडेशन’ आहे. जगभरातील सर्व व्यावसायिक विमाने याच पद्धतीची आहेत. ‘जेट एअरवेज’कडील ७३७-३०० या गटातील विमाने १९९४ पासून हवाई वाहतुकीमध्ये कार्यरत आहेत.
उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने ‘७३७ मॅक्स’ या विमानांची रचना करण्यात आली आहे. ही विमाने इंधनबचतपूरक असून त्यांची इंधन परिणामकारकता १५ टक्क्यांपर्यंत आहे. ही कामगिरी विमानाच्या बांधणीतील बदल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विंग्लेट्समुळे साधता आली आहे. या विंग्लेट्समुळे विमानाच्या ‘एअरफ्लो’मध्ये सुसूत्रता आली असून परिणामकारकता २ टक्क्यांनी वाढली आहे.
या विमानाच्या कामगिरीत भर घालण्याचे काम सीएफएम लीप-१बी या इंजिनाने केले आहे. हे इंजिन अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बनविण्यात आले आहे. या इंजिनामध्ये ६९ इंच आकाराचा पंखा असून त्यामधील पात्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. पंख्यातील अल्ट्र-लाइट पाती ही कार्बन फायबर काम्पोझिट्सपासून तयार करण्यात आली आहेत. इंजिनमध्ये बसविण्यात आलेल्या शेवरनमुळे विमानाचे वजन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजात ४० टक्क्यांनी कपात झाली आहे. या इंजिनासाठी फारशी देखभालीचीही आवश्यकता नसते.
‘जेट’च्या ताफ्यात ‘७३७ मॅक्स’चा समावेश केल्याबद्दल ‘जेट एअरवेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय दुबे म्हणाले, “७३७ मॅक्स’च्या समावेशामुळे ‘जेट एअरवेज’ आणि भारतीय हवाई क्षेत्रामध्ये एका नवीन अध्यायाला प्रारंभ होत आहे. ‘७३७ मॅक्स’ हे विमान आमच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच हवाई प्रवाशांना ज्या पद्धतीचा अनुभव हवा आहे, तो देण्याचे काम या विमानाद्वारे केले जाईल. तसेच हे विमान इंधन बचतपूरक असल्यामुळे आमच्या संस्थेची वाढ होण्यास तसेच खर्चात कपात करण्यासही मदत करील.”
‘जेट एअरवेज’च्या या नवीन ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या विमानामध्ये अनेक नवीन सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे ग्राहकांना उत्तम प्रवास केल्याचा अनुभव मिळेल. प्रवाशांचे जेव्हा विमानामध्ये आगमन होईल तेव्हा ‘बोईंग स्काय इंटेरिअर’द्वारे त्यांचे स्वागत केले जाईल. विमानाची अंतर्गत रचना अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामध्ये अॅंटी ग्लेअर एलइडी लायटिंगचाही समावेश आहे. या विमानाच्या प्रवासामधील वेगवेगळ्या टप्प्यांनुसार ‘स्काय इंटिरियर’द्वारे नऊ प्रकारची अंतर्गत रचना आपोआप बदलण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अंतर्गत सजावटीची रचना ‘जेट एअरवेज’ ब्रॅंड रंगसजावटीशी पूरक आहे. त्यामुळे विमानप्रवास करताना प्रवाशांना नेत्रसुखद अनुभव मिळेल. तसेच प्रवाशांसाठी सामान ठेवण्याच्या जागेची रचनादेखील बदलण्यात आली आहे. त्याद्वारे प्रवाशांना ‘केबिन लगेज’मध्ये अधिक सामान ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे ‘बोर्डिंग’ प्रक्रिया वेगवान होऊन विमाने वेळेत सुटणार आहेत.
‘७३७ मॅक्स ८’ या विमानामध्ये सर्वसाधारण विमानांमध्ये आढळणारे ‘प्रीमियर’ आणि ‘इकॉनॉमी’ असे गट आढळणार आहेत. या विमानातील १२ आसने ‘प्रीमियर’ गटामधील असून १६२ आसने ‘इकॉनॉमी’ गटासाठी आहेत. या विमानामध्ये ३३० तासांचे ताजे मनोरंजनविषयक कार्यक्रम प्रवाशांना अनुभवता येतील. या कार्यक्रमांमध्ये हॉलिवुड, बॉलिवुड तसेच प्रादेशिक चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, गेम शो, संगीत यांचा समावेश आहे.
‘प्रीमियर’ गटामधील आसनांसाठी वापरण्यात आलेले लेदर हे ‘वूल्सडॉर्फ’ या कंपनीचे आहे. ‘पोर्शे’, ‘मर्सिडीज’सारख्या आलिशान गाड्यांनाही ही कंपनी लेदर पुरवते. ‘प्रीमियर ट्रॅव्हलर’ गटासाठी ही आसने म्हणजे सर्वांगसुंदर अनुभव आहे. या आसनांच्या ‘लुक’पासून त्याच्या आरामदायी अनुभवासाठी खूप बारकाईने काम करण्यात आले आहे. या आसनांना युएसबी पोर्ट, लॅपटॉप चार्जर्स, पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होल्डर्सची सुविधा आहे. ही आसने अत्यंत आरामदायी असून प्रवाशांना पाय मोकळे करण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. ही आसने ७-१०” एवढी मागेपुढे होऊ शकत असल्यामुळे प्रवाशांना हवाई प्रवासाचा थोडासुद्धा शीण जाणवणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
‘प्रीमियर’ गटामधील आसनांची पीच ४०” असून ‘इकॉनॉमी’ गटामधील पीच २९ ते ३१” या दरम्यान आहे. ‘इकॉनॉमी’ गटामधील आसनेदेखील उत्तम दर्जा आणि आकर्षक रंगसंगतीची आहेत. या गटामधील आसनांनादेखील ‘रिक्लाइन’, युएसबी पोर्ट, पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहेत.
‘जेट एअरवेज’चे ‘७३७ मॅक्स’ हे फ्लाइट (९ डब्ल्यू ४५७) ‘मुंबई ते हैदराबाद’ हा प्रवास १ जुलै २०१८ रोजी करणार आहे.
‘जेट एअरवेज’बद्दल :
‘जेट एअरवेज’ही भारतामधील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणारी विमानकंपनी असून या कंपनीद्वारे ६४ ठिकाणी सेवा पुरवली जाते. ‘जेट एअरवेज’चा व्यग्र हवाईमार्ग देशाचा सर्व भाग व्यापणारा आहे. त्यामध्ये मेट्रो शहरे, विविध राज्यांच्या राजधान्या आणि नव्याने पुढे येणाऱ्या शहरांचा समावेश आहे. भारताबरोबरच ‘जेट एअरवेज’द्वारे दक्षिण-पूर्व आशिया, दक्षिण आशिया, मध्य-पूर्वेतर देश, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील महत्त्वाच्या शहरांबरोबर विमानसेवा चालवली जाते.
‘जेट एअरवेज’च्या ताफ्यात सध्या ११९ विमाने असून त्यामध्ये बोइंग ७७७-३०० इआरएस, एअरबस ए३३०-२००/३०० या विमानांचा तसेच बोइंग ७३७ आणि एटीआर ७२-५००/६०० यांचा समावेश आहे.

