-विद्युत वाहनांची व सुट्या भागांच्या निर्मितीसाठी चाकणच्या कारखान्यात महिंद्र समुहातर्फे
आणखी गुंतवणूक
– महिंद्रच्या विद्युत वाहन व सुट्या भागांच्या निर्मितीला महाराष्ट्र सरकारतर्फे पायोनीअर मेगा
प्रोजेक्ट असा दर्जा
– सरकारशी झालेल्या करारानुसार, पुढील वर्षभरात 1000 विद्युत वाहने महिंद्रतर्फे प्रमुख शहरांत
होणार दाखल.
मुंबई : विद्युत वाहनांच्या उत्पादनाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी महिंद्र अॅन्ड महिंद्र या कंपनीने महाराष्ट्र सरकारशी
दोन करार केले. विद्युत वाहनांचा वापर व्यक्तिगत तसेच सार्वजनिक स्वरुपात पूर्णपणे करण्याच्या सरकारच्या
धोरणाचा भाग म्हणून हे करार करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्य सचिव आणि उद्योग खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी, तसेच महिंद्र अॅन्ड
महिंद्र कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका यांनी या करारांवर सह्या केल्या. याप्रसंगी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, महिंद्र समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र आणि इतर मान्यवर
उपस्थित होते. विद्युत वाहनांचा वापर करण्यात महाराष्ट्र हे राज्य जगात अग्रभागी असावे व राज्यात या वाहनांचा
वापर अधिकाधिक व्हावा, या उद्देशाने हे करार करण्यात आले,
पहिल्या करारानुसार, महिंद्र अन्ड महिंद्र कंपनीच्या चाकण येथील कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या
ठिकाणी विद्युत वाहने, इ-मोटर, कंट्रोलर, बॅटरी पॅक व अन्य सुटे भाग यांची निर्मिती करण्यात येईल. यासाठी कंपनी
500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दुसऱ्या करारान्वये, महिंद्र कंपनीने महाराष्ट्र राज्यात विद्युत वाहने मुख्य
शहरांमध्ये विकायची आहेत. या कामी राज्य सरकार कंपनीला मदत करणार आहे. महिंद्रची विद्युत वाहने टॅक्सी
संघटनांनी, प्रवासी कंपन्यांनी, लॉजिस्टिक्स कंपन्यांनी वापरावीत, यासाठी सरकार व महिंद्र कंपनी संयुक्तपणे प्रयत्न
करणार आहेत. सुमारे 1000 वाहने येत्या 1 वर्षात विकण्याचे उद्दीष्ट सध्या ठेवण्यात आले आहे.
या घडामोडींची माहिती देताना डॉ. पवन गोयंका म्हणाले, ‘चाकणमध्ये विद्युत वाहनांच्या निर्मितीचा विस्तार
करण्याचा कार्यक्रम आखताना आम्हाला आनंद होत आहे. याकामी आम्हाला सतत प्रोत्साहन व मदत देणाऱ्या
महाराष्ट्र सरकारचे आम्ही आभार मानतो. देशात वाहतुकीच्या क्षेत्रात विधायक पावले उचलण्याचे आमचे कार्य गेल्या
दशकभरापासून सुरू आहे. ते यापुढेही सुरू राहील. विद्युत वाहनांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करून
आम्ही पर्यावरणाविषयी आमची जागरुकता दर्शवित आहोत. व्यक्तिगत व सार्वजनिक वाहतुकींमध्ये या विद्युत
वाहनांचा अधिकाधिक व जलद गतीने उपयोग व्हावा, या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्र सरकारने आमचे हे
प्रयत्न ओळखले आहेत व आमच्या कामात सरकार सहभागी झाले असल्याने आगामी काळात आमची या क्षेत्रातील
प्रगती अशीच होत राहील, असा विश्वास वाटतो.’
उत्पादीत झालेल्या विद्युत वाहनांचा पहिला 25चा ताफा हा मुंबईतील झूमकार या कंपनीला जागतिक पर्यावरण
दिनाच्या निमित्ताने पाठविण्यात येणार आहे. अन्य वाहने राज्यात विविध कारणांसाठी, उपक्रमांसाठी पाठविली
जातील. यात घर ते कार्यालय असा प्रवास करण्यासाठी काही विशिष्ट अधिकाऱ्यांना या गाड्या देण्यात येतील. तसेच
टॅक्सी व्यावसायिक, खासगी वाहतूकदार, ग्राहकाने स्वतः चालविण्यासाठी भाडेतत्वावर गाड्या देणारे यांचा विचार
प्राधान्याने करण्यात येणार आहे.
महिंद्र कंपनीतर्फे मोटर कंट्रोलर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी पॅक, ड्राईव्हट्रेन व अन्य उपकरणे, सुटे भाग आयात केले
जातात. त्यांचे उत्पादन करण्यासाठी कंपनीतर्फे भागीदार शोधण्यात येत आहेत. हे सुटे भाग महिंद्र समुहातील अन्य
कंपन्यांना व इतर ग्राहकांना पुरवण्यात येतील.
प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात मोठे बदल होणे यापुढील काळात अपेक्षित असून महिंद्र समूह त्यात आघडीवर असणार
आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हा यामागील एक उद्देश असेल. महाराष्ट्र सरकारनेदेखील या उद्दीष्टांची दखल घेतली
असून विद्युत वाहनांच्या विस्तारीत उत्पादनाच्या प्रकल्पाला ‘पायोनीअर मेगा प्रोजेक्ट’ असा दर्जा सरकारने दिला
आहे.