मुंबई: आयसीआयसीआय बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना विनामूल्य कोविड-19 लसीकरण करण्याचे आज जाहीर केले आहे. कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंबीय यांचे कोविड-19 महामारीपासून संरक्षण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महामारीच्या कालावधीदरम्यान लाखो ग्राहकांना सुरळित सेवा देण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन केलेले काम, दाखवलेली चिकाटी यांचे कौतुक करण्याचा उद्देशही या उपक्रमामागे आहे.
आयसीआयसीआय बँकेचे ग्रुप चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर टी. के. श्रीरंग यांनी याविषयी बोलताना त्यांनी सांगितले, “सध्या सुरू असलेल्या महामारीदरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना केलेल्या अथक परिश्रमांची दखल घेण्यासाठी आणि त्यांचे खऱ्या अर्थी कौतुक करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने हा उपक्रम आयोजित केला आहे. आयसीआयसीआय कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कर्तव्यदक्षता दाखवली आहे आणि एक अत्यावश्यक सेवा म्हणून देशाची सेवा करण्याचे कर्तव्य चोख बजावले आहे. महामारीच्या या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी उत्तम काम केले आहे आणि कर्तव्याबद्दलची प्रेरणा आणि निष्ठा पुन्हा दाखवून दिली आहे.
बँकेच्या दृष्टीने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीय यांचे हीत व कल्याण सर्वाधिक महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने, बँकेने प्रत्येक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे कोविड-19 महामारीपासून संरक्षण करण्याच्या हेतूने हा उपक्रम जाहीर केला आहे. महामारीमुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असली तरी कर्तव्यदक्षता दर्शवणाऱ्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार.”
कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंबीय यांच्या लसीकरणासाठी येणाऱ्या खर्चाची भरपाई आयसीआयसीआय बँक देणार आहे.

