पुणे: विख्यात वन्यजीवन प्रेमी आणि पर्यावरणीय कार्यकर्ते बिट्टू सहगल यांनी ‘किड्स फॉर टायगर्स’ या शैक्षणिक उपक्रमाची स्थापना 2000 मध्ये केली. भारतातील ग्रामीण आणि शहरी मुलांसाठी निसर्गातून भटकंती, विविध उत्सव आणि कार्यशाळा आयोजित करण्यातून हा उपक्रम सुरू झाला. सुरुवातीस नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळूरसारख्या शहरांमधून सादर होणारा ‘किड्स फॉर टायगर्स’ उपक्रम आता अन्य शहरे व गावांमधील 10 लाखांहून अधिक मुलांपर्यंत पोहोचत आहे.
‘किड्स फॉर टायगर्स’ हा उपक्रम कल्याणी स्कूलमध्येही सुरू करण्यात आला आहे. गेल्या दि. 23 जुलै रोजी या शाळेत पर्यावरण क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास दीपक दलाल, बिट्टू सहगल, डॉ. परवेश पंड्या, बिक्रम ग्रेवाल आणि मधु भटनागर यांची उपस्थिती लाभली. प्रेक्षकांमध्ये इतर शाळांचे शिक्षक व प्राचार्य, तसेच वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
प्रख्यात बाल कथाकार, निसर्गप्रेमी व भटकंती करण्यात रमणारे दीपक दलाल हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळा कसे बदल घडवून आणू शकेल, यावर त्यांनी प्रेक्षकांना मार्गदर्शन केले. गेटा थर्नबर्ग यांच्या क्रांतिकारी भाषणातून एक उद्धृत मजकूर त्यांनी वाचला व हवामान बदलाशी संबंधित लढा देण्यासाठी तत्काळ हालचाली करायला हव्यात, असे समजावून दिले.
यानंतर डॉ. परवेश पंड्या आणि बिट्टू सहगल यांनी एका दृकश्राव्य स्वरुपाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. ‘निसर्गाचे म्हणणे एेका’, या विषयावरील या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
बिक्रम ग्रेवाल यांनी नंतर प्रेक्षकांना भारतातील विविध पक्षी व प्राणी यांच्या प्रजातींची झलक दाखवली. त्यांनी नागालँडच्या काही पर्यावरणीय कार्यकर्त्यांच्या कार्याचे प्रदर्शन केले. अमूर फाल्कन, या एका स्थलांतर करीत येणाऱ्या पक्षाची शिकार थांबवण्यासाठी हे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत.
पृथ्वीचे दर सेकंदाला काही प्रमाणात नुकसान करणाऱ्या पर्यावरणविषयक संकटांबद्दल मधू भटनागर यांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त करीत, या संकटांना सामोरे जाण्याची गरज व्यक्त केली. कल्याणी स्कूलमध्येही त्या पर्यावरणशास्त्र शिकवीत असतात.
या सर्व सादरीकरणांनंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला. उत्साही प्रेक्षकांद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहुण्यांनी दिली.
वाघ या प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी काही प्रयत्न करायला हवेत, असा संदेश घेऊन तशा निवेदनावर अतिथी व प्रेक्षकांनी स्वाक्षऱ्या केल्या व या कार्यक्रमाचा समारोप झाला.