पुणे : क्लाऊड-डिलीव्हर्ड एन्डपॉईंट या दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या क्राऊडस्ट्राईक या कंपनीने पुण्यात संशोधन व विकास विभाग सुरू केला आहे. आशिया-पॅसिफिक व जपान या भूप्रदेशात उलाढाल वाढविण्याच्या दृष्टीने कंपनीने भारताची, त्यातही पुण्याची निवड केली आहे. क्राऊडस्ट्राईक कंपनीने भारत, आग्नेय आशिया व उत्तर आशिया या विभागांसाठी जगदीश महापात्रा यांची व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती केली आहे.
‘क्राऊडस्ट्राईक’ने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आपले कामकाज 2015 मध्ये सुरू केल्यानंतर या कंपनीला आशिया-पॅसिफिक क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला व नवीन ग्राहक मिळण्याबरोबरच कंपनीची वाढ शंभर टक्क्यांहून अधिक झाली. त्यामुळे या भूप्रदेशातील कारभाराबद्दल आत्मविश्वास वाढून ‘क्राऊडस्ट्राईक’ने भारतात विस्तार करण्याचे ठरविले आहे. ‘क्राऊडस्ट्राईक फाल्कन प्लॅटफॉर्म’, ‘थ्रेट इन्टेलिजन्स’ ही उत्पादने आणि इतर सेवा यांचा विस्तार या भागात करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
क्राऊडस्ट्राईक कंपनीने आशिया खंडासाठी जगदीश महापात्रा यांची व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती केली आहे. कंपनीचा पाया या भूप्रदेशात मजबूत करण्याची व नवीन संधी शोधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. क्राऊडस्ट्राईकमध्ये येण्यापूर्वी महापात्रा हे मॅकफी या कंपनीत आशिया-पॅसिफिक विभागाचे प्रमुख या पदावर कार्यरत होते. त्यांनी तेथे चांगली कामगिरी बजावली होती. त्यापूर्वी ते ‘मॅकफी’चे भारत व सार्क सदस्य देशांसाठीचे व्यवस्थापकीय संचालक होते. ‘मॅकफी’च्या अगोदर महापात्रा दहा वर्षे ‘सिस्को’मध्ये कार्यरत होते.
महापात्रा या प्रसंगी म्हणाले, ‘’सायबर सुरक्षेसाठीची बाजारपेठ आता बदलली आहे. अशा वेळी एन्डपॉईंट सुरक्षा क्षेत्रात नवीन मानके तयार करण्यात आघाडीवर असणाऱ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी अतिशय उत्साहीत आहे. एन्डपॉईंट सुरक्षा साधण्यासाठी ’क्लाऊड-नेटीव्ह’ पध्दत अधिक प्रभावी आणि कार्यक्षम आहे, तसेच ती वापरण्यास बाजारपेठ सज्ज आहे, हे क्राऊडस्ट्राईक कंपनीला मिळालेल्या यशावरून सहज दिसून येते. ‘क्राऊडस्ट्राईक’ला भारतात व सार्क देशांमध्ये कारभार वाढवायचा आहे व याकामी मी सतत गतीशील राहणार आहे.’’
सायबर सुरक्षितता क्षेत्रात प्रतिभावान मनुष्यबळाची टंचाई ओळखून स्थानिक विद्यापीठांबरोबर भागीदारी वाढवण्यासाठी ‘क्राऊडस्ट्राईक’ने पुणे शहराची निवड केली आहे. ‘क्राऊडस्ट्राईक’चे मुख्य उत्पादन अधिकारी, अमोल कुलकर्णी हे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे (सीईओपी) येथील पदवीधारक आहेत. ते या प्रसंगी म्हणाले, ‘‘क्राऊडस्ट्राईक’चे संशोधन केंद्र पुण्यात स्थापन होत आहे. ही कंपनी सीओईपी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायबर सुरक्षा विभागाला सायबर शिक्षण व प्रशिक्षणार्थी उपलब्ध करून देणार आहे. त्यात मला सहभागी होता येत आहे, ही मोठीच अभिमानाची बाब आहे.’’
पुण्यात नावीन्यपूर्ण संशोधनाचे केंद्राची उभारणी करण्याबरोबरच आशियामध्ये नवीन ग्राहक मिळवणे व त्यांना सेवा देणे याची यंत्रणाही क्राऊडस्ट्राईक कंपनी येथूनच उभारणार आहे.
“एका जलद वाढणाऱ्या उद्योगातील आघाडीची कंपनी म्हणून, क्राउडस्ट्राईकचा व्यवसाय आशिया-पॅसिफिक भागात सतत विस्तारत आहे. सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रादेशिक बाजारांमध्ये ही कंपनी संसाधने उभी करत आहे. यापेक्षाही जास्त यश कंपनीला मिळवून देण्याचा मी व माझे सहकारी मिळून प्रयत्न करणार आहोत. भारत आणि सार्क देशांतील बाजारांमध्ये आमच्या व्यवसायास प्रचंड वाव आहे. ही आमच्यासाठी मोठी संधी आहे’’, असे क्राऊडस्ट्राईकचे आशिया-पॅसिफिक आणि जपान विभागाचे उपाध्यक्ष अॅन्ड्र्यू लिट्लप्राऊड म्हणाले.
अॅन्टी व्हायरस (एव्ही), एन्डपॉईंट डिटेक्शन आणि प्रतिसाद (एडीआर) आणि व्हायरस शोधण्याची चोवीस तास चालणारी यंत्रणा या सर्वांचा एकमेव व एकत्रित तोडगा क्राऊडस्ट्राईक फाल्कन या सॉफ्टवेअरमधून ग्राहकाला मिळतो. क्राऊडस्ट्राईक फाल्कनच्या माध्यमातून ग्राहकाला व्हल्नरॅबिलिटी मॅनेजमेंट, आयटी हायजिन, थ्रेट इंटेलिजन्स ऑटोमेशन, डिव्हाईस कंट्रोल आणि बऱ्याच गोष्टी एकत्रित मिळतात.
क्राऊडस्ट्राईक कंपनीच्या क्लाऊड-नेटिव्ह नेटवर्क्ससाठी सध्या बरीच मोठी मागणी आहे. अनेक कंपन्या सध्या वापरत असलेली अॅन्टी व्हायरस सॉफ्टवेअर्स बदलून टाकण्याचा विचार करीत आहेत. त्यांना प्रगत एंडपॉईंट डिटेक्शन आणि रिस्पॉन्स क्षमता केवळ क्राऊडस्ट्राईकच देऊ शकते.
जगभरात दररोज 150 अब्ज इतक्या सुरक्षा यंत्रणांचा आढावा सध्या क्राऊडस्ट्राईककडून घेतला जातो. क्राऊडस्ट्राईक फाल्कन या सॉफ्टवेअरची ही क्षमता वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे. म्हणूनच नवीन ग्राहक व त्यांच्यासाठीचे क्लाऊड-नेटीव्ह मॉड्यूल्स यांचा विस्तार करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

