रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपा आक्रमक झाली असून राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. राज्यातील नेत्यांकडून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला जात असताना केंद्रातील नेतेही अटकेच्या कारवाईचा निषेध करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
अमित शाह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. प्रेसवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे”.

