मुंबई मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा शनिवारी मीरारोड येथील एका चित्रपटगृहात मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीकडून विनयभंग करण्यात आला. याविषयी त्यांनी पोलिसांकडे संबंधित व्यक्तीची तक्रार केली. सुरक्षारक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचंही बेर्डे यांनी सांगितलं. ‘बोरिवलीतील ४३ वर्षीय सुनील जानी नामक व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर कलम ३४५ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणी माध्यमांना दिेलेल्या माहितीत बेर्डे म्हणाल्या,’या सर्व प्रकाराचा माझ्या मुलीला धक्काच बसल्याचं सांगत झाल्या प्रकाराबद्दल न घाबरता तक्रार दाखल केल्याचं त्या म्हणाल्या. महिलांच्या विनयभंगाच्या या सर्व घटनांना कुठेतरी आळा घालण्याची गरज असून, या सर्व गोष्टींविरोधात पाऊल उचण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी मांडलं. त्याशिवाय या प्रकरणी आपल्याला सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.
घटनेबाबत सांगताना त्या म्हणाल्या ,’‘मुलीसोबत चित्रपट पाहण्यासाठी मी गेले होते. त्यावेळी सुरुवातीपासूनच तो माणूस माझ्याकडे पाहत होता. मी त्याच्याकडे फार काही लक्ष दिलं नाही. त्यानंतर तो मनुष्य उठून गेला. मुख्य म्हणजे तो इतरांनाही त्रास देत होता. काही वेळानंतर तो बाहेर गेला आणि पुन्हा माझ्या बाजूची एक सीट सोडून बसला. थोड्या वेळाने तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणवल्यानंतर मी त्याला मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण, मी त्याचा पाठलाग केला आणि सुरक्षारक्षकांना त्याबद्दलची माहिती दिली

