‘व्हेअर आर वुई नाऊ‘च्या चित्रीकरणासाठी पुण्यात दाखल
पुणे –रजनीशांच्या साधनेमुळे ही पुण्याचा लौकिक जगभर आहे असे मत अभिनेत्री किरण दुबे हीने इथे व्यक्त केले ….
‘सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘कुसुम’, ‘जस्सी जैसी कोई नही’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून दिसलेल्या किरण दुबे हिने आपला झेंडा सातासमुद्रापार रोवला आहे. सुरुवातीला मॉडेलिंग व नंतर छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या किरणने आपल्या प्रतिभेच्या जोरावर गरूडझेप घेत थेट हॉलिवूडकडे भरारी घेतली. आपल्या ‘व्हेअर इज शी नाऊ’ या चित्रपटासाठी किरण दुबे हिने नुकताच ‘लॉस एंजेलिस हॉलिवूड फिल्म काँपीटिशन २०१७’ चा ‘बेस्ट अॅक्ट्रेस अॅवॉर्ड’ जिंकला आहे.
‘व्हेअर इज शी नाऊ’ चित्रपटाची पुढील आवृत्ती ‘व्हेअर आर वुई नाऊ’ या चित्रपटातही किरण दुबे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अमेरिकेसह भारतात मुंबई व पुण्यात होत आहे. या चित्रपटामध्ये स्थानिक कलाकार आदित्य आगाशे व गायिका अपूर्वा यांचाही समावेश आहे. सध्या त्यांचे पुण्यातील कोरेगाव पार्क, रॉक कॅफे येथे चित्रीकरण सुरु असून त्यासाठी ती पुण्यात आली असता तिने पत्रकारांशी संवाद साधला.
किरण दुबे… मूळची देहरादूनची असलेली ही गोंडस मुलगी शिकण्यासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाली व आपसूकच शहराच्या प्रेमातच पडली. तिने पुण्यातच राहून मॉडेलिंगमध्ये तिचे करीअर सुरु केले. इतकेच नव्हे तर बंटी प्रशांतसमवेत तिने मॉरिन वाडिया यांच्या ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल स्पर्धेत भाग घेत तिने दुसरा क्रमांकही पटकावला.
त्यानंतर किरण दुबेने पुढील संधींचा शोध घेत तिने झी इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या शोचे कोच आलोक उल्फत यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य-कला क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक नाटकांत सहभाग नोंदवल्यानंतर तिच्यातील प्रतिभेमुळे छोट्या पडद्यावर विविध मालिकांमध्ये आपला अभिनय दाखवण्याच्या अनेक संधी तिला मिळाल्या. ‘सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘कुसुम’, ‘क्या हादसा क्या हकीकत’, ‘जस्सी जैसी कोई नही’ यांसारख्या अनेक मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली.
किरण कोहीनूर डायमंड्सचा युएसएमधील चेहरासुद्धा राहिली आहे. त्याचसोबत तिला एका आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्मसाठी अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या मुलाखतीसाठीही ओळखले जाते.
किरणला सातत्याने नवनव्या गोष्टी शिकण्याची आवड आहे. त्यामुळे ऐन भरात असलेले टीव्ही करीअर सोडून अभिनयाचे पुढील शिक्षण तिने लंडन व लॉस एंजेलिसची वाट धरली. ‘रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रामॅटीक आर्ट’ व ‘सेंट्रल स्कूल ऑफ स्पिच अॅन्ड ड्रामा’ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून तिने अभिनयाचे धडे गिरवले. लॉस एंजेलिसमध्ये किरणची भेट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता व तसेच अभिनय व फिल्म मेकिंगचे प्राध्यापक असणाऱ्या जॉन हेन्ही रिचर्डसन यांच्याशी झाली.
जॉन रिचर्डसन यांनी किरणवर विश्वास दाखवत तिला ‘व्हेअर इज शी नाऊ’ या सिनेमात संधी दिली. ‘डॉक्युमिस्टरी’ या आगळ्यावेगळ्या जॉनरच्या या चित्रपटाचे शूटिंग अमेरिका व युरोपातील देशात करण्यात आले होते. या चित्रपटाला लंडन, बर्लिन व लॉस एंजेलिस येथील चित्रपट महोत्सवांमध्ये तब्बल ३२ अॅवॉर्ड्स आतापर्यंत मिळाली आहेत.
किरणने ‘व्हेअर इज शी नाऊ’मध्ये अभिनय तर केलाच मात्र त्याचसोबत ती या चित्रपटाची सहनिर्मातीही होती. याच चित्रपटासाठीच किरणला ‘लॉस एंजेलिस हॉलिवूड फिल्म काँपीटिशन २०१७’ मध्ये ‘गोल्ड अॅवॉर्ड फॉर बेस्ट अॅक्ट्रेस’ या पुरस्काराने नावाजण्यात आले आहे. पुण्यातील काम पूर्ण झाल्यानंतर ती बर्लिन तसेच प्राग या शहरामधील फिल्म काँपीटिशनसाठी निघणार आहे. किरण ही अध्यात्मिक गुरू ओशोची अनुयायी असून आपल्या आयुष्यात मेडिटेशन करण्यावर तिचा विशेष भर असतो. भविष्यात किरणला बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये मेनस्ट्रीम सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा आहे.

