पुणे, – वडगाव, धायरी व किरकिटवाडी परिसरात मोठ्या संकुलांना महावितरणचे नियम डावलून नवीन वीजजोडणी दिल्याप्रकरणात महावितरणच्या आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे किंवा नाही याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे, असे संकेत सुत्रांनी दिले आहे.
हे सर्व प्रकरण एका तक्रारीनुसार प्रादेशिक संचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीतून उघड झाले आहे. या प्रकरणी दोन सहाय्यक अभियंत्यांना अगोदरच निलंबित करण्यात आले आहे.
पर्वती विभागामधील वडगाव धायरी उपविभागाच्या कार्यक्षेत्रात पीएमआरएडीएची परवानगी नसलेल्या मोठ्या संकुलांना महावितरणचे सर्व नियम धाब्यावर बसवून नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे व त्यात महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची एक तक्रार पुणे प्रादेशिक संचालकांना प्राप्त झाली. या तक्रारीची गांभिर्याने दखल घेऊन त्याची चौकशी करण्यासाठी प्रादेशिक संचालक कार्यालयाने अधिकाऱ्यांना पाठवले. त्यांच्या अहवालातील प्राथमिक निष्कर्षात वडगाव शाखेचे सहाय्यक अभियंता व्यंकटगीर गिर व किरकीटवाडी शाखेचे सहाय्यक अभियंता अनिल इगवे यांनी महावितरणच्या परिपत्रके, नियम डावलून वरिष्ठांना अंधारात ठेवणे. याशिवाय कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर उभे न करता नसलेला अधिकार वापरत संकुलांना नवीन वीजजोडण्या दिल्याचे स्पष्ट झाले. यात महावितरणचे आर्थिक नुकसान झाल्याचेही निष्कर्षात नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सहाय्यक अभियंता श्री. गीर व श्री. इगवे यांना महावितरणच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान मोठ्या संकुलांना नवीन वीजजोडणी देण्याच्या कार्यवाहीचा अधिकार शाखा कार्यालयास नसतानाही अशा प्रकारे किती नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. यात वरिष्ठांचे दुर्लक्ष झाले किंवा काही मोठ्या अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश आहे किंवा नाही याबाबतची चौकशी वरिष्ठ पातळीवरून महावितरणने सुरु केलेली आहे. प्रादेशिक कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नियम व परिपत्रके डावलून अशा प्रकारे मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.