स्वतंत्र यंत्रणा विकसित करा :मा. उपमहापौर आबा बागुल यांची प्रशासनाला सूचना
पुणे –
सध्या आषाढ महिन्यामुळे दररोज मोठ्याप्रमाणावर कोंबड्या ,मासे आणि मटणाची उलाढाल वाढली आहे मात्र त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची स्वतंत्र यंत्रणाच पालिकेकडे नसल्याची वस्तुस्थिती उघडकीस आली आहे. परिणामी दुर्गंधी, रोगराईमुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी तातडीने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सध्या आषाढ महिना सुरु आहे आणि मटण ,मासे ,कोंबड्यांची आवक वाढली आहे . त्यामुळे दररोज कित्येक टन कोंबड्या, मासे , मटण पुणेकर फस्त करीत आहेत. केवळ आखाड नव्हे तर वर्षभर कोंबड्या, मासे , मटण याची उलाढाल मोठी असते मात्र त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाटीबाबत स्वतंत्र अशी यंत्रणा पालिकेची नाही. परिणामी या कचऱ्यामुळे रोगराई आणि दुर्गंधीचे प्रमाणही वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.
मासे ,मटण , कोंबड्यांची विक्री करणारे व्यावसायिक निर्माण होणारा कचरा सरसकट कचरापेटीत टाकतात . साहजिकच कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने कधी कधी आंदोलनाला सामोरे जाण्याची स्थिती शहरावर ओढवते. वास्तविक यासाठी बंदिस्त वाहनांची यंत्रणा असणे आवश्यक आहे आणि मटण ,मासे ,कोंबड्या यातून निर्माण होणाऱ्या शेकडो टन कचऱ्याचा वापर मत्सालय किंवा अन्य ठिकाणी होणे सहजशक्य आहे. त्यामुळे दररोज निर्माण होणाऱ्या शेकडो टन कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तातडीने बंदिस्त वाहने घेऊन स्वतंत्र यंत्रणा विकसित करावी अशी सूचना आबा बागुल यांनी प्रशासनाला केली आहे.

