आता अवयव प्रत्यारोपणासाठी ”हेली अँम्ब्युलन्स”ला चालना द्या,नव्याने उभारणाऱ्या हॉस्पिटलमध्ये हेलिपॅड बंधनकारक करा
माजी उपमहापौर आबा बागुल यांची पालिका प्रशासनाला सूचना
पुणे –
क्षेत्रफळाच्यादृष्टीने मुंबईपेक्षा पुणे मोठे ठरले आहे आणि दिवसेंदिवस ते विस्तारत आहे. आता हॉस्पिटलसाठी ४ एफएसआय उपलब्ध होणार असल्याने ३६ मजली इमारत होणार आहे. सध्या वाहतुकीचे प्रमाण पाहता अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीनकॅरिडॉर निर्माण करणे जवळजवळ अशक्य होत जाणार आहे. त्यामुळे नवीन हॉस्पिटलच्या बांधकामांना परवानगी देताना इमारतीवर हेलिपॅड बंधनकारक करण्याची मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भांत आयुक्तांना दिलेल्या पत्रात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, रुग्णांना अत्यावश्यक सेवा त्याही वेळेत मिळण्यासाठी आता ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत आणि त्यासाठी एअरअँब्युलन्सची सुविधा उभारण्याला चालना द्यावी लागणार आहे. त्यानुसारच बांधकाम नियंत्रण नियमावलीत सवलत देणे आवश्यक आहे. नव्याने उभ्या राहणाऱ्या हॉस्पिटलला ४ एफएसआय दिल्याने ३६ मजली होणाऱ्या इमारतींवर हेलिपॅड उभारणे सहजशक्य आहे. परिणामी अवयव प्रत्यारोपण असेल किंवा रुग्णांना तातडीचे उपचार मिळेल त्यासाठी कॅरिडॉर करण्याची गरज भासणार नाही. सद्यस्थितीत एअरअँब्युलन्सची सुविधा आहे मात्र हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड मर्यादित आहेत किंवा ते कुठे उतरवावे हा प्रश्न आहे आणि हॉस्पिटलपर्यंत येण्यास ग्रीनकॅरिडॉर करणे अनिवार्य आहे ;पण वाढत्या वाहतुकीचा विचार करता भविष्यात ते अशक्य ठरणार आहे. त्यामुळे नवीन हॉस्पिटलला बांधकाम परवानगी देताना इमारतीवर हेलिपॅड बंधनकारक करावे, असे आबा बागुल यांनी पत्रात म्हटले आहे.