… अखेर पालिकेचे रखडलेले पुरस्कार सुरु होणार !
माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे – सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील महनीय, दिग्गज व्यक्तिमत्वांचा महापालिकेतर्फे पुरस्काराद्वारे सन्मान करण्याचा खंडित झालेला मार्ग अखेर मोकळा झाला असून रखडलेल्या पुरस्कारांचे वितरणही आता लवकरच होणार आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शहराला अनेक महनीय, दिग्गज व्यक्तिमत्वे लाभली आहेत . गेल्या ७० वर्षात त्यांच्या कार्याप्रती आदर आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्या- त्या महनीय व्यक्तींच्या नावाने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात येतो,तोही तरतुदीनुसार मात्र राज्यशासनाच्या एका परिपत्रकामुळे या परंपरेत खंड पडण्याची स्थिती ओढवली आणि आठ – नऊ महिने या पुरस्कारांचे वितरण थांबले.राज्यशासनाच्या परिपत्रकाचा आणि न्यायालयाचे निर्देश पुढे करून पुरस्कारांचे वितरण रोखण्यात आल्याने माजी उपमहापौर आबा बागुल यांनी कायद्यातील तरतुदींकडे वारंवार लक्ष वेधून हे पुरस्कार सुरु करण्याची मागणी केली होती आणि तसा ठरावही दिला होता. पक्षनेत्यांच्या बैठकीत हे रखडलेले पुरस्कार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता संत जगनाडे महाराज, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, स्वरभास्कर आदी पुरस्कारांच्या वितरणाचा मार्ग सुकर झाला आहे. गतवर्षी रखडलेले आणि यंदाचे १७ पुरस्काराचे वितरण आता होणार आहे.या निर्णयाबद्दल बोलताना माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्व पक्षनेत्यांसह सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींचेही आभार मानले आहे. आबा बागुल म्हणाले, ज्या महनीय व्यक्तींचा सन्मान केला जातो ,त्यांच्याकडून कधीही पुरस्काराच्या रकमेची मागणी होत नाही. आपणच ती देत असतो. मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यशासनाने सरसकट पुरस्कार कार्यक्रमावर घातलेली बंदी होती . केवळ पुणे नाही तर अन्य महापालिकाही त्यांच्या -त्यांच्या शहरातील महनीय व्यक्तींचा सन्मान करीत असते. त्यामुळे जे पुरस्कार सुरु केलेले आहेत,ते कदापि बंद करू नयेत. महनीय व्यक्तींच्या नावाने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आणि त्यासाठी येणारा खर्च पाहता कोणतीही उधळपट्टी पुणे महानगरपालिकेकडून होत नसल्याचे राज्यशासनाला निदर्शनास आणून द्या तसेच कायद्यातील तरतुदीनुसार मानधन न देणे ही तरतुद निदर्शनास आणून देऊन पुरस्कार पुन्हा सुरु करा , यासाठी सतत पाठपुरावा केला ,त्याला सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी साथ दिली,त्यांच्या लढ्याला यश आले असे मी मानतो,असे आबा बागुल म्हणाले.