पुणे
शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपीकडे नागरिक आकर्षित व्हावे आणि खासगी वाहने न वापरता सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर वाढावा यासाठी पुणे महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवासासाठी चार महिन्यापूर्वी मान्य केलेल्या ठरावाची अंमलबजावणी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे हे तत्परतेने करणार का ? असा सवाल माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपस्थित केला आहे.
पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकाची सूत्रे हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी ‘लेटलतीफ’ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पीएमपीला शिस्त लावण्याचा धडाका त्यांनी सुरु केला असून पीएमपीच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी त्यांनी कडक पाऊल उचलले आहेत . या पार्श्वभूमीवर शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपीकडे नागरिक आकर्षित कसे होतील आणि खासगी वाहनांचा वापर टाळून पीएमपीचा वापर वाढावा यासाठी चार महिन्यांपूर्वी पालिकेच्या मुख्यसभेने मंजूर केलेल्या महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवासाचीच पुणेकरांना अजूनही प्रतिक्षाच करावी लागत असल्याचे चित्र आहे त्यामुळे पीएमपीचे सूत्रे हाती घेणारे तुकाराम मुंढे आता पुणेकरांना दिलासा देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पीएमपीला तोट्यातून वाचविण्यासाठी तसेच या योजनेचा आर्थिक भार पडू नये यासाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयेही महापालिका पीएमपीएमएलला अदा करणार आहे.
सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर अधिकाधिक वाढावा त्याचबरोबर एक दिवस तरी प्रदूषण टळावे आणि इंधन बचतीलाही चालना मिळावी या उद्देशाने तत्कालीन उपमहापौर आबा बागुल यांनी महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून पुणेकरांना मोफत प्रवासाबाबत ठराव दिला होता. स्थायी समितीसह मुख्यसभेनेही एकमताने संमत करून तो पीएमपीएमएलकडे पाठविला होता मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.
यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, पीएमपीचे सक्षमीकरण झालेच पाहिजे ;पण शहराच्या सार्वजनिक सेवेची लाईफलाईन असणाऱ्या पीएमपीकडे पुणेकर आकर्षित होणेही गरजेचे आहे तसेच नागरिकांना त्यांच्या खासगी वाहनाचा वापर टाळून पीएमपी बससेवेचा वापर करण्याची सवय लागावी आणि पीएमपीची तूटही कमी होईल या हेतूने महिन्यातून शेवटच्या सोमवारी पीएमपीतून पुणेकरांसाठी मोफत बसप्रवासाचा ठराव दिला मात्र आता महापालिका निवडणूक संपूनही या मान्य ठरावाची पीएमपीएमएल प्रशासनाकडून अजूनही अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी तत्परतेने या ठरावाची अमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे आबा बागुल म्हणाले .