एका एसएमएसवर ,घरपोच मिळतेय मोफत मातीचे भांडे
अमित बागुल आणि सहकाऱ्यांचा विधायक उपक्रम
पुणे
उन्हाचा पारा वाढतोय आणि चारा -पाण्याच्या शोधात हजारो पक्षी कासावीस होताहेत. दरवर्षी उन्हाच्या तीव्र झळा आणि पाणी न मिळाल्याने हजारो पक्षी तडफडून प्राण सोडतात मात्र गेल्या चार वर्षांपासून पक्ष्यांसाठी ‘पाणीदान’चा उपक्रम राबविला जात आहे आणि पाणीदानाची ही चळवळ व्यापक होत आहे. विशेष म्हणजे पक्ष्यांना वाचविण्यासाठी फक्त एक एसएमएस करा आणि घरपोच मोफत भांडे मिळवा ही संकल्पनाच पक्ष्यांसाठी आधारवड ठरली आहे.
माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य अमित बागुल हे हा अभिनव उपक्रम गेल्या चार वर्षांपासून राबवित आहेत.
सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता वाढली आहे,साहजिकच सर्वांच्या जीवाची घालमेल होत आहे. माणसांची ही स्थिती मग मुक्या जीवांचे काय हाल होत असतील नेमका हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन अमित बागुल आणि सहकाऱ्यानी उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने तडफडून प्राण सोडणाऱ्या हजारो पक्ष्यांना वाचविण्यासाठी पाणीदान ही चळवळ उभी करण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष्यांसाठी कुंभाराकडून खास मातीचे भांडे बनवून घेण्यात आले. जनजागृतीसाठी पत्रकांचे वाटप करून घरालगत , टेरेसवर पक्ष्यांना पाणी ठेवण्याचे आवाहन केले. मात्र जे खरच पक्ष्यांसाठी भांडे ठेवतील अशाच लोकांना भांडे देण्यासाठी एक एसएमएस करा आणि मातीचे भांडे मोफत घरपोच देण्याची संकल्पना राबविली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आता चौथ्या वर्षात या उपक्रमाने पदार्पण केले आहे आजमितीस या उपक्रमांतर्गत सुमारे पाच हजार मातीचे भांडे घरपोच स्वतः अमित बागुल , सागर आरोळे , विजय बिबवे , धनंजय कांबळे , बाबासाहेब पोळके ,अभिजित निकाळजे, योगेश निकाळजे आदी सहकार्यांनी पोहचविले आहेत.केवळ सहकारीच नव्हे तर नागरिकही या पाणीदान चळवळीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून सहभागी झाले आहेत.
अन्नदान … रक्तदान मग पाणीदान का नको
या उपक्रमाबाबत अमित बागुल म्हणाले , आपण अन्नदान करतो , रक्तदान करतो मग मुक्या जीवांना वाचविण्यासाठी पाणीदान उपक्रम का राबवू नये हा प्रश्न मनात आला आणि पक्ष्यांना उन्हाळ्यात दिलासा देण्यासाठी ,त्यांचा जीव वाचविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला. दरवर्षी पाणी न मिळाल्याने हजारो पक्षी तडफडून प्राण सोडतात, या विदारक स्थितीवर नियंत्रण मिळविणे आपल्याला सहजशक्य आहे. फक्त कृतीची जोड आवश्यक आहे . ही एक चळवळ आहे. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी आम्ही वृक्ष दत्तक योजनाही राबविली आहे. रक्षाबंधनानिमित्त वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण जोपासण्याची शपथ घेतली जाते. केवळ जनजागृती नाही तर प्रत्यक्ष कृतीवर भर अशा आमच्या योजना असतात. उन्ह्यात तडफडून प्राण सोडणाऱ्या पक्ष्यांसाठी आजपर्यंत पाच हजार भांड्यांचे वाटप झाले आहे पण पक्ष्यांसाठी किती कुटुंबे हे नाही तर कुटूंबाच्या माध्यमातून एकप्रकारे हजारो व्यक्ती या उपक्रमाद्वारे सक्रिय झाल्या आहेत याचाच आनंद आहे, अशी प्रतिक्रियाही अमित बागुल यांनी दिली.

