रहाटणी :
‘एसएई इंडिया’ (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), ‘इटॉन टेक्नॉलॉजी’, ‘जॉन डियर’, ‘कमिन्स इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहनांची छोटी मॉडेल्स तयार करण्याच्या ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2016’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी शरद लोधी (एच आर विभागप्रमुख, इटॉन इंडिया इंजिनिअरींग) यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी रितू राज (व्यवसाय संचालक, जॉन डियर), श्रीनिवास राघवन (कमिन्स), डॉ. के. सी. व्होरा (उपाध्यक्ष, एसएई इंडिया), प्राचार्य जयश्री वेंकटरमण (एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल), व्यंकटेश मांडके (व्हिजीए), बी.व्ही. शामसुंदर (‘एसएई इंडिया’वेस्टर्न सेक्शन) आदी मान्यवर उपस्थित होते. सलील शेख (ए डब्ल्यू आय एम, पुणे ऑलिम्पिकचे संयोजक) यांनी आभार मानले.
21 शाळांमधून 240 विद्यार्थ्यांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता. यामध्ये ‘जेट टॉय’ निर्मिती स्पर्धेत 39 संघ तर‘स्किमर निर्मिती’ स्पर्धेत 11 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे हे नववे वर्ष होते. ही स्पर्धा एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल ( रहाटणी, पिंपरी चिंचवड) येथे आयोजित केली होती.
उद्घाटनप्रसंगी शरद लोधी म्हणाले, ‘कोणतीही गोष्ट आनंदाने आणि ती गोष्ट करण्यातली मजा लुटत केल्यास त्यातील आनंद सुख समाधान अधिक मिळते. विद्यार्थ्यांनी कोणतीही गोष्ट आनंंदाने सकारात्मकतेने करायला शिकले पाहिजे.’
श्रीनिवासन राघवन म्हणाले, ‘विज्ञानातील जादू शिकण्यात एक वेगळीच मजा असते. विज्ञान जाणून घेतल्यास, विद्यार्थी त्यातील सिद्धांतावर आधारित गेम, टॉईज बनवू शकतात. स्वत: विज्ञान जादूगार बनू शकतात.’
के. सी. व्होरा यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात बोलताना ते म्हणाले, ‘2008 साली सुरू झालेल्या या स्पर्धेला वर्षानुवर्षे चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी 21 शाळेतील 240 विद्यार्थी सहभागी झाले असून, काही वर्षांनी इतका प्रतिसाद वाढेल की ही स्पर्धा मोठ्या स्टेडियममध्ये घ्यावी लागेल. ही स्पर्धा प्रथम अमेरिकेत सुरू झाली. ही स्पर्धा घेणारा भारत हा दुसरा देश आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.’
ए डब्ल्यू आय एम पुणे ऑलिंपिक स्पर्धेतील जेट टॉय स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघ तसेच स्किमर स्पर्धेतील विजेता संघ ‘अ वर्ल्ड इन मोशन राष्ट्रीय ऑलिम्पिक 2016’ स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत. ही स्पर्धा 7 जानेवारी 2017 रोजी ‘हॉटेल मॅपल एमरल्ड’ (न्यू दिल्ली) येथे होणार आहे.