पुणे, ता. १६ : मुकुल माधव विद्यालयात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (एफआयएल) तांत्रिक संचालक सौम्या चक्रवर्ती आणि रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजरोहणानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यानी त्यांच्या गाणी, नृत्य, तबला, कराटे आणि एरोबिक्सच्या विशेष सादरीकरणाद्वारे देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला. तसेच स्वातंत्र्यदिनावर आधारित रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मुकुल माधव विद्यालयाच्या कलाकारांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यात आले. यासोबतच, विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे केली.
शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाअंतर्गत रांगोळी, भाषण, कला आणि घोषवाक्य बनविण्यासह विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. बारावीची विद्यार्थिनी कु.अन्विषा जाधव हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

