पुणे
ज्येष्ठ इतिहास संशोधक, साहित्यिक आणि शिवचरित्राचे व्याख्यातेर निनाद बेडेकर यांचं आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. पुण्यातील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पार्थिवावर उद्या, सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
२००९ मध्ये वयाची साठी पूर्ण केल्यानंतर बेडेकरांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती केली होती. शिवकालीन इतिहासाबद्दलची त्यांची ही तळमळ लक्षात घेऊन, शिवरायांच्या चरित्राची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी आणि गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारनं अलीकडेच नेमलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शन म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीनं बोलू शकणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीत निनाद बेडेकर यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गड-किल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात अक्षरशः रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच मोडी आणि पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केलं होतं. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केलं होतं. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्य आजच्या ‘एमबीए’वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही भाषण दिली होती. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी व्याख्यानमाला आयोजित केल्या होत्या.