पुणे : समग्र आंबेडकरी आंदोलनात २० मार्च १९२७ रोजीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड चवदार तळ्याच्या लढ्याने सामाजिक समतेची चळवळ देशात गतिमान केली. डॉ. आंबेडकरांनी चवदार तळ्यातील पाणी पिवून जातिव्यवस्थेने ग्रस्त असलेल्या वंचित समाजामध्ये आत्मसन्मान जागवला आणि त्याद्वारे विषमतावादी देशाची वाटचाल समतामूलक भारताकडे झाली. देशभर आंबेडकरी चळवळीत २० मार्च हा दिवस समता दिवस म्हणून साजरा केला जातो.
यंदा या सत्याग्रहाला ८९ वर्ष पूर्ण होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला आणि महाडच्या चवदार तळ्याच्यासत्याग्रहाला आपले प्रेरणास्थान मानणाऱ्या 20th March Ventures Private Limited कंपनीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाटलीबंद पिण्याचेपाण्याच्या उत्पादन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अविचल धिवार, गोरखनाथ रोकडे, मिलिंद जाधव, प्रभाकर रंगारी, सुनील सोनटक्के हे संचालक यावेळी उपस्थित होते.
दिनांक २० मार्च च्या या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर 20th March Ventures Private Limited हि कंपनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणाऱ्या अनु. जाती संवर्गातील ५ सदस्यांनी १० जानेवारी २०१४ रोजी स्थापन केली आहे. या कंपनीद्वारे बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे उत्पादन पाबळ, ता. शिरूर येथे कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेल्या कारखाण्यात लवकरच होणार आहे. बाटलीबंद पिण्याचे पाणी उत्पादन क्षेत्रात, 20th March या नावाने कंपनी स्वत:चा ब्रँड ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अविचल धिवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते पुढे म्हणाले की, ”पुण्यामधील मार्केटच्या मागण्या लक्ष्यात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी ६–८ महिन्यांचा कालावधी येथे स्थिरस्थावर होण्यासाठी लागेल. हा प्रकल्प उत्तरप्रदेश छत्तीसगढ आणि तेलंगणा मध्ये सुरु करण्याची विचारणा देखील होत आहे.यामाध्यमातून आमचे पुढचे लक्ष्य हे दक्षिण आणि उत्तर भारतभर जाऊन हा ब्रँड राष्ट्रीय पातळीवर पोहचवणे राहील. यातून होतकरू सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचाही आमचा मानस आहे.
उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या कंपनीने प्राप्त केल्या असून; केंद्र सरकारच्या बीआयएसच्या मानकाप्रमाणे आरोग्यास पोषक अशी कारखाण्याची इमारत व परिसर निर्माण केला आहे. अद्यावत व अत्याधुनिक प्रयोग शाळा व स्वयंचलित यंत्र सामग्री सारख्या आवशक त्या सर्व साधनसामग्रीची व्यवस्था कंपनीने उभारली आहे पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया ९ टप्प्यांची असून, तिची उत्पादन क्षमता १० हजार लिटर प्रती तास एवढी आहे. यानुसार महिन्याला सुमारे २० लाख लिटर पाणी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बाटलीबंद पाण्याचे २५० मिली, ५००मिली, १ लिटर व २ लिटर अशा वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन आणि २० लिटर जार सुद्धा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. कंपनीच्या उपक्रमातून उत्पादन, वितरण व व्यवस्थापन विभागात मिळून सुमारे ७० सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.
हा संपून प्रकल्प ८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर उभा राहत असून त्यापैकी ४.५० कोटी आयएफसीआय व्हेंचर कॅपिटल फंड्स लिमिटेड यांनी व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल्ड कास्ट या योजनेतून १०% दराने अर्थसहाय्य दिले आहे. तर, ३ कोटी रुपयांचे भागभांडवल कंपनीने अनु. जातीच्या ५० सदस्यांकडून जमा केले आहे. याशिवाय इंडियन बँकेच्या पुणे कँन्टोन्मेंट शाखेतून १ कोटी रुपयांचे खेळते भांडवलाचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
बीआयएसची परवानगी मिळाल्यानंतरच म्हणजेच पुढील ४०-४५ दिवसात अनु. जातीमधील पहिल्या पिढीचा उद्योग व्यावसायिकदृष्ट्या कार्यरत होईल.