पुणे : सहकारनगर भागात गेल्या काही आठवड्यांपासून वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा झाल्याचा निषेध करण्यासाठी आज पद्मावतीच्या महावितरण कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध समस्यांची कैफियत महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी हे आंदोलन केले.
महावितरणचा या गोंधळी कारभाराचा निषेध करण्यासाठी सहकारनगर परिसरातील शेकडो नागरिक यात सहभागी झाले होते. यावेळी कार्यकारी अभियंता किशोर गोरडे यांना आंदोलकांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली. शिवाय महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील वीज पुरवठा आंदोलकांनी खंडित केला होता.
गेल्या सहा महिन्यांपासून आठवड्यातून तीन-चार वेळेस विद्युत पुरवठा खंडित होतो आहे. त्यामुळे ऐन उन्हाळा सुरु असताना ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुलांसह सामान्यांचे मोठे हाल होत आहेत. या संदर्भात तक्रारीसाठी महावितरणच्या कार्यालयात संपर्क केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. शिवाय स्थानिक पातळीवर काँल सेंटरचा सहायक नंबर सुरु करावा, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे. या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर आणखी तीव्र करण्याचा इशारा अमित बागुल यांनी दिला आहे.
यावेळी सागर आरोळे, विजय बिबवे, विक्रम खन्ना, बाबालाल पोकळे, महेश ढवळे, राम रणपिसे, इम्तियाज तांबोळी, सचिन महांगडे, अमर ससाणे, विकास मनोरे, धनंजय कांबळे, नंदा ढावरे, मंदा साखरे, कौशल्या सरोदे, प्रकाश आरणे, राजाभाऊ गायकवाड, रवी ननावरे, रघुनाथ खवळे, मधुकर कदम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



