पुणे – सिंहगड रस्ता येथील सनसिटी आणि नऱ्हे परिसरात रविवारी पहाटे 84 दुचाकी आणि सहा मोटारींना आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्यक्तीशी संशयिताचे वर्णन मिळते-जुळते असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सह पोलिस आयुक्त सुनील रामानंद यांनी सोमवारी दिली.
विनोद शिवाजी जामदारे (वय 27, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) असे त्या संशयिताचे नाव आहे. सीसीटीव्हीमधील व्यक्ती आणि संशयितामध्ये साधर्म्य आहे. ती व्यक्ती आणि जामदारे या दोघांनीही टी-शर्ट आणि जीन्स पॅंट परिधान केले असून, पोलिसांचा त्याच्यावर दाट संशय आहे; परंतु त्यानेच वाहनांना आग लावल्याचा पुरावा पोलिसांना अद्याप मिळाला नसल्याचे रामानंद यांनी स्पष्ट केले. वाहनांना आग लावणारी व्यक्ती ही विकृत मनोवृत्तीची माथेफिरू आहे की गुन्हेगार, हे स्पष्ट झाले नाही. जामदारे हा सिंहगड रस्ता परिसरातील सराईत गुंड बंट्या पवार याच्या टोळीतील असून, त्यालाही पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. जामदारे याने रविवारी नीलेश अमृत चव्हाण (वय 45, रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द) याचा खून केल्याचा संशय आहे. या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. तो रविवारी पहाटे कोठे होता, यासह इतर बाबी तपासण्यात येत आहेत. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस आयुक्त के. के. पाठक आणि रामानंद यांनी विशेष पथके तयार केली आहेत. त्या दृष्टीने सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात येत आहे. शहर पोलिसांनी रात्री गस्तीवर असताना काही तडीपार आणि फरारी गुन्हेगारांना अटक केली आहे. शहरातील काही उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक नाहीत. तेथील अंतर्गत सुरक्षा ही सुरक्षारक्षकांवर अवलंबून असून, बाहेरील सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. सुरक्षारक्षक नेमण्याबाबत सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत; परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.