आग्रा
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २००हून अधिक मुसलमानांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्म जागरण समन्वय विभाग आणि बजरंग दलाच्यासोबत तयार केला होता. ‘पुरखों की घर वापसी’, अशा नावाखाली जवळपास ५७ मुस्लिम कुटुंबांना हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश देण्यात आला.
संघाचे पदाधिकारी राजेश्वर सिंह यांनी सांगितले की, २००हून अधिक मुस्लिमांना पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. ज्या धर्मांतर केले आहे त्यांना नवीन नावे देण्यात येतील. तसेच नाताळच्या निमित्ताने अलीगड येथे देखील पाच हजाराहून अधिक मुस्लिम आणि ख्रिश्चयन लोकांना आपल्या मूळ धर्मात आणले जाणार आहेत. यासाठी म्हणून माहेश्वरी कॉलेजमध्ये भव्य समारोह आयोजित करण्यात येणार आहे.
भगवा ध्वज आपल्या घरावर लावून त्यानंतर ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारणांसोबत देवी-देवतांचे चरण धवून या मुस्लिम परिवारांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. त्यांनी डोक्याला टिळा लावला तसेच यज्ञात हवन देखील केले. त्यानंतर त्या लोकांच्या नावाची यादी बनवण्यात आली जेणेकरून त्यांना नवे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र देता येईल.
या प्रकरणी एसएसपी सलभ माथुर यांनी सांगितले की, या कार्यक्रमासंदर्भात पोलिसांशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. जर लोक स्वमर्जीने धर्म बदलू इच्छित असलतील तर त्यांना तसे करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. कारण तो देशातील जनतेचा मूळ अधिकार आहे.