जयपूर -‘लष्करी अधिकाऱ्यांच्या दोन पिढ्या कसलंही युद्ध न लढताच निवृत्त झाल्या, ‘गेल्या ४० वर्षांत युद्धाचे प्रमाण कमी झाल्याने भारतीय लष्कराचं महत्त्व कमी होत चाललंय,’ असं वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलं आहे. मात्र, ‘मी युद्धाचा पुरस्कर्ता आहे असा अर्थ यातून काढू नका,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
‘सीमा सुरक्षेची आव्हानं व उपाय’ या विषयावर जयपूर येथे झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ‘सर्वत्र शांतता असल्यानं देशातील सामान्य नागरिकांच्या लेखी आता लष्करी जवानांना महत्त्व उरलेलं नाही. जवानांना लोकांचा आदर मिळेनासा झाला आहे. त्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागत आहे. गेल्या ४०-५० वर्षांत युद्धाचे प्रमाण कमी होणं हेच याचं कारण असल्याचे पर्रीकर म्हणाले. ‘लष्करी अधिकाऱ्यांच्या दोन पिढ्या कसलंही युद्ध न लढताच निवृत्त झाल्या हे खरं आहे. पण, याचा अर्थ लोकांनी सैनिकांना आदर देऊ नये असं नाही. जो देश आपल्या लष्कराचं रक्षण करू शकत नाही, त्यांचं हित जपू शकत नाही, तो कधीच प्रगती करू शकत नाही, असं ते म्हणाले.
राज्य सरकारांचा दृष्टिकोनही सैनिकांच्या बाबतीत उदासीन आहे. सैनिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल मी अनेक मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यावर कार्यवाही केली आहे. अनेक ठिकाणी सैनिकांना होणारा त्रास थांबला आहे,’ असंही पर्रीकर यांनी स्पष्ट केलं.