पुणे, दि. 28 : वीजवापराची मीटरमधील नोंद रिमोट कंट्रोलद्वारे सोयीनुसार केव्हाही थांबविता येणार्या चोरीचा शहरातील तिसरा प्रकार महावितरणने उघडकीस आणला आहे.
वडगाव शेरी येथील डी-पॅलेस हॉटेलमध्ये रिमोट कंट्रोलद्वारे सुरु असलेली 1 लाख 56 हजार 62 युनिटची म्हणजे 33 लाख 3 हजार 765 रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 27) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की वडगाव शेरी येथील डी-पॅलेस हॉटेलमध्ये अक्रम एम. देवडा यांच्या नावे वाणिज्यिक वीजजोडणी आहे तर परेश खंडेलवाल हे वीज वापरकर्ता आहे. या हॉटेलमधील वीजवापराबाबत अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महावितरणने केलेल्या विश्लेषणात संशय निर्माण झाला. त्यानुसार हॉटेलमधील वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. प्रथमदर्शनी वीजमीटरची गती संथ असल्याचे दिसून आली. पुढील तपासणीत या हॉटेलमधील वीजमीटरच्या आतील पीटी (पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मर) सर्कीटकडे जाणारे वायर्स ब्रेक करून त्यामध्ये रिमोट कंट्रोलचे सर्कीट समाविष्ट केल्याचे आढळून आले. या सर्कीटच्या सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत असल्याचे दिसून आले. रिमोट कंट्रोलचे सर्कीट छुप्या पद्धतीने लावल्यानंतरही महावितरणच्या अभियंता व कर्मचार्यांनी या वीजचोरीचा छडा लावला. डी-पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 1,56,062 युनिटची म्हणजे 33 लाख 03 हजार 765 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
डी-पॅलेस हॉटेलमधील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. गुलाबराव कडाळे, श्री. दत्तात्रय बनसोडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. पंडित दांडगे, सहाय्यक अभियंता कैलास कांबळे, जे. पी. मालोकर, विजय जाधव, अनघा जोशी, माधुरी वैद्य, व्ही. ए. पगारे, तंत्रज्ञ नंदकिशोर गायकवाड, साईनाथ दांगडे आदींनी योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी डी-पॅलेस हॉटेलचे वीजजोडणीधारक अक्रम एम. देवडा व वीजवापरकर्ता परेश खंडेलवाल यांच्याविरुद्ध शुक्रवारी (दि. 27) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.


