सिनेमाच्या नायकावरच का सारे अवलंबून असावे ? असा प्रश्न मनात ठेवून जाणारा आणि सहायक अभिनेते , खलनायक , नायिका , छोटे छोटे रोल करणारे पात्र एखादा सिनेमा किती रंजक करू शकतात हे पहायचे असेल तर हा सिनेमा नक्की पाहायला हवा . मराठी परंपरेतील एक हलकी फुलकी मजेदार कॉमेडी म्हणून ‘प्रेमासाठी कमिंग सून ‘ या सिनेमाचा आवर्जून उल्लेख करता येईल .
अदित्य (अदिनाथ कोठारे) हा एक होतकरू तरूण.. अदित्यच्या आजीने (सुहास जोशी) त्याच्यासाठी अंतराचे (नेहा पेंडसे) स्थळ आणले आहे. अंतराचा सांभाळ तिचे मामा (विजय पाटकर) व मामीने (रेशम टिपणीस) केलेला असतो. अदित्य व अंतराचा विवाह पार पडतो. लग्नाच्या पहिल्या सकाळीच अंतरा सोन्याचे दागिने घेऊन अदित्यच्या घरातून गायब होते. अदित्य शेवटी पोलिसांत जातो. तेथे अंतरा फसवेगिरीत अट्टल असल्याचे त्याच्या लक्षात येते. मग अदित्य याचा छडा लावण्याचे व अंतराला प्रेमाने जिंकण्याचे ठरवतो. दरम्यान अंतराने संग्राम कोलते पाटलांचे (जितेंद्र जोशी) स्थळ गाठलेले असते. अदित्य तेथे पोहोचतो. मग अंतराचे मनपरिवर्तन करून तिला प्रेमाने जिंकतो. आणि शेवट गोड होतो अशा आशयाची सर्वसाधारण कथा आहे . पण प्रेम म्हणजे काय असते – ते आजी नातवाच्या नात्यावरून स्पष्ट करणारी हि हि गोष्ट आहे असे मानता येईल . आपल्या मुलीचा सासरी हुंड्यावरून झालेला छळवाद आणि जाळून मारण्याचा झालेला प्रयत्न यावरून एखाद्या मातापित्यांच्या जीवनाची शैली समाजावरच कशाप्रकारचा बदला घेण्याच्या मनस्थितीत पोहोचू शकते हे सांगणारी हि कथा आहे या दृष्टीकोनातूनही याकडे बघता येईल .
चित्रपटाच्या पूर्वार्धात रसिकांना खिळवून ठेवण्याचा सर्व भार सहायक अभिनेता असलेल्या विजय पाटकर यांनी समर्थपणे पेलला आहे एक विनोदी सहायक अभिनेता हा मुख्य नायक नायिका असतानाही अशा प्रकारचे कौशल्य दाखवू शकतो हे कथा आणि दिग्दर्शन यांचे महत्वाचे अंग मानावे लागेल . चित्रपटाच्या मध्यंतरानंतर जवळ पास खलनायक असलेला जितू जोशी भाव खावून गेला आहे . आदिनाथ कोठारे नायक आहे त्याने त्याचे काम ठीक केले आहे . नेहा पेंडसेने छान अभिनय केला आहे , रेशम टिपणीस चे वेगळे वळण भावणारे आहे . तिच्या मुलाची भूमिका केलेला तरुण तसेच नेहाच्या जाळ्यात अडकलेल्या कोकणातील तरुण वासू (नितीन जाधव ) , पुण्यातला तरुण केशव फडके (चिन्मय कुलकर्णी ) ,ओउरंगाबादचा तरुण जॉन धागे (योगेश शिरसाठ ) या कलावंतांनी हि सिनेमात चांगला रंग भरला आहे . . सिनेमोटोग्राफी तसेच संगीत विषयात म्हणजे एकूण गाण्यात आणि नृत्यामध्ये मात्र विशेष प्रभाव दिसत नाही पण मराठी रसिकांना विना टेन्शन मजेदार हलकी फुलकी अशी हि कॉमेडी नक्कीच एकदा तरी पाहायला आवडेल अशी आहे . अनुपकुमार पोतदार , संजय सांकला ,अमन विधाते मुलचंद देढीया असे चार निर्माते असून अंकुर काकतकर दिग्दर्शक आहेत