Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्वच्छ भारत अभियानासाठी स्वच्छ भारत कोष; मुख्यमंत्र्यांच्या उपगटाची शिफारस

Date:

नवी दिल्ली : स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र व राज्य पातळीवर ‘स्वच्छ भारत कोष’ निर्माण करण्यात यावा. स्वच्छ भारत दीर्घकालीन करमुक्त कर्ज रोखे उभारण्याबरोबरच देशातील वापरात नसलेली 1 कोटी 39 लाख शौचालये सुरु करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशा शिफारशी स्वच्छ भारत अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपगटाने केंद्र शासनास केल्या आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपगटाने या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आर्थिक, तांत्रिक, लोकसहभाग, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छताविषयक जनजागृती आदी विषयांवर एकत्रित अहवाल केंद्र शासनास बुधवारी सादर केला. निती आयोगाच्या सभागृहात या अहवालाचे सादरीकरण निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुश्री खुल्लर यांनी केले.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरयानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मिझोरामचे मुख्यमंत्री लाल थानवाला, महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव मिलींद म्हैसकर यांच्यासह सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि दिल्ली आदी राज्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छता कराची सूचना
मुख्यमंत्र्यांच्या या उपगटाने स्वच्छ भारत अभियानासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना मुलभूत सेवा पुरविण्यासाठी मुबलक निधी देण्यात यावा असे सूचविले आहे. ज्या सेवांना कर आकारण्यात येतो अशा सेवांना स्वच्छ भारत कर लागू करण्यात यावा. कोळसा, अॅल्युमिनीयम, लोखंड निर्मिती तसेच जैविक कचरा, पेट्रोल व डिझेल याबरोबरच रासायनिक कंपन्या व टेली कम्युनिकेशन कंपन्यांवरही हा कर लावण्यात यावा. करातून मिळालेला निधी राज्यांच्या स्वच्छ भारत कोशामधे जमा करण्यात यावा.

पुढील तीन वर्षांसाठी केंद्र व राज्यांच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात यावी. स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व राज्य शासनाने निधी उपलब्धतेसाठी उपाययोजना आखाव्यात. याचबरोबर राज्य व केंद्र शासनाच्या इतर योजनांचा निधी आवश्यकता भासल्यास स्वच्छ भारत अभियानासाठी वळविण्यात यावा. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (सीएसआर) च्या माध्यमातूनही निधी उभा करण्यात यावा. देणग्यांच्या स्वरूपात निधी घेण्यात यावा व अशा देणग्या पूर्णपणे करमुक्त करण्यात याव्यात. देशातील वापरात नसलेली 1 कोटी 39 लाख स्वच्छतागृहे उपयोगात आणण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. मानवाद्वारे मैला वाहतूक पद्धती पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशा सूचनाही या उपगटाने केल्या आहेत.

राज्यस्तरीय मिशनची निर्मिती
स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र व राज्य स्तरावर राष्ट्रीय व राज्यस्तरीय मिशनची निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्र शासन स्तरावर पंतप्रधानांच्या तर राज्य स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. राज्यपातळीवर तयार करण्यात येणाऱ्या मिशनसाठी प्रकल्प संचालक, अंमलबजावणी यंत्रणा, कौशल्यवृद्धी केंद्र, स्वच्छ भारत कोष व माहिती शिक्षण व संवाद यंत्रणा निर्माण करण्याची सूचना या उपगटाने केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती या अभियानासाठी स्थापन करण्यात येणार आहे. राज्य शासनाचे संबंधित विभाग हे या समितीचे सदस्य असणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालीही उच्चाधिकार समितीसुद्धा स्थापन करण्यात यावी, ही समिती स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कार्य करेल. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानासाठी अधिकाऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व नगरपालिका व महानगरपालिकांमधे स्वच्छता व्यवस्थापन कक्ष निर्माण करण्यात यावा. या कक्षाच्या माध्यमातून घनकचरा व ओला कचरा व्यवस्थापनाचे कार्य करण्यात यावे. केंद्र स्तरावर राष्ट्रीय तांत्रिक मंडळ निर्माण करण्यात यावे व या मंडळाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनासाठी तांत्रिक सहाय पुरविण्यात यावे, ज्यामुळे लोकसहभाग वाढविण्यास मदत होईल. नामांकित संशोधन संस्थांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानात वाढविण्यात यावा जेणेकरून अभियान यशस्वितेसाठी प्रभावी तंत्रज्ञान विकसित करता येऊ शकेल.

शालेय अभ्यासक्रमात स्वच्छता विषयाचा समावेश
स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी शालेय अभ्यासक्रमात स्वच्छता विषयाचा समावेश व्हावा. पदवी व पदव्युत्तर अभ्याक्रमात पर्यावरण, विज्ञान, आरोग्य अभियांत्रिकी, महापालिका अभियांत्रिकी यासारखे अभ्यासक्रम सुरु करण्यात यावेत. उच्च शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्ता केंद्र निर्माण करण्यात यावे, ज्याद्वारे घनकचरा व्यवस्थापनाचे संशोधन करता येऊ शकेल. विदेशी विद्यापीठांच्या सहयोगाने कचरा व्यवस्थापन संशोधनास चालना देण्यात यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांच्या या उपगटाने केल्या आहेत.
स्वच्छ भारत आठवडा साजरा करावा
वर्षातून एकदा स्वच्छ भारत आठवडा साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हापरिषद, महानगरपालिका, राज्य व राष्ट्रीय पातळीवर या अभियानाचा आढावा घेण्यात यावा आणि उत्तम कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. यावर सर्व मुख्यमंत्र्यांचे एकमत झाले. देशात ‘राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियान ‍दिन’ साजरा करण्याबाबतही चर्चा झाली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील असे सांगण्यात आले. देशातील सर्व राज्य सरकार, केंद्र सरकारच्या नगरविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय यांच्याशी चर्चा करून निती आयोग डिसेंबर २०१५ पर्यंत स्वच्छ भारत अभियानाचा मसुदा तयार करेल, अशी माहिती यावेळी निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुश्री खुल्लर यांनी दिली.

यापूर्वी याचवर्षी ३० एप्रिल, १९ मे आणि २४ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या या उपगटाची बैठक पार पडली. त्यानंतर संबंधित राज्यांच्या विभागांचे वरिष्ठ अधिकारी, केंद्र सरकारच्या नगरविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे अधिकारी, निती आयोगाच्या अधिकाऱ्यांमध्येही बैठका पार पडल्या.

२०१७ पर्यंत महाराष्ट्र हागणदारी मुक्त करू- मुख्यमंत्री श्री. फडणवीस
महाराष्ट्र राज्य 2017 सालापर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत बोलून दाखविला. मुंबईमधील केंद्र शासनाच्या जागा व सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या (सिआरझेड) जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छतागृह बांधता येत नाहीत. त्यामुळे हागणदारीमुक्त झोपडपट्ट्या करण्यास अडचणी निर्माण होतात, तेव्हा अशा जागांवर स्वच्छतागृह उभारण्यास मंजुरी द्यावी, अशी सूचना श्री.फडणवीस यांनी यावेळी केली. काही विषयाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याने निती आयोगाकडून अशा विषयांबाबत स्पष्ट धोरण तयार करावे, अशी सूचनाही श्री.फडणवीस यांनी केली.

उपगटात सहभागी सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगले काम केले असून त्यांच्या सूचनानंतर तयार होणाऱ्या आराखड्यातून ‘स्वच्छ भारत’ व ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ प्रभावीपणे राबविले जाणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक शिफारशी :-

• शौचालय निर्मितीस सर्वोच्च प्राधान्य.
• प्रभावी संवाद यंत्रणा.
• स्वच्छता, पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यविषयक अभ्यासक्रमांचा समावेश.
• विदेशी विद्यापीठांचे घनकचरा व्यवस्थापनासाठी सहकार्य.
• जनजागृतीसाठी स्वतंत्र निधी.
• शौचालय निर्मितीसाठी 12 हजार रुपये अनुदान
• अतिदुर्गम भागात शौचालय निर्मितीसाठी विशेष भर.
• स्वच्छ भारत अभियानासाठी राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक मंडळ.
• केंद्र, राज्य, जिल्हास्तरावर स्वच्छ भारत अभियानासाठी स्वतंत्र यंत्रणा.
• नगरपालिका व महापालिकांमध्ये स्वच्छता व्यवस्थापन कक्ष.
• नामांकित संशोधन संस्थांचा सहभाग.
• कचऱ्यापासून वीज निर्मितीस चालना.
• शहरी भागात सशुल्क शौचालयाची निर्मिती.
• झोपडपट्टी भागात शौचालय निर्मिती.
• मानवाद्वारे मैला वाहतूक पद्धत पूर्णपणे बंद करणे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली..!

प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी रशिया सोबत संबंधाची पायाभरणी...

पंतप्रधानांकडून अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त

पीएमएनआरएफमधून अनुदान जाहीर मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे ...

पुण्याचे मोहोळ जबाबदार:विमान प्रवाश्यांच्या हलाखीच्या स्थितीवर नाम फौंडेशन आणि राष्ट्रवादीच्या सोनाली देशमुख आक्रमक

परभणी:डीजीसीएने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन पत्रं पाठवली: इंडिगोला १८-२२% पायलट कमी...

गोव्यातील नाइट क्लबमध्ये सिलींडर स्फोट, 25 जणांचा मृत्यू

गोव्यातील अरपोरा परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका नाईट क्लबमध्ये...