सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी नाट्यसोहळा संपन्न, चित्रपट सोहळा ६ एप्रिल रोजी * महोत्सवातून जमलेला निधी ‘नाम’ फाउंडेशनला देणार
मुंबई- संस्कृती कलादर्पण रजनी पुरस्कार सोहळ्याने नाटक आणि चित्रपट अशा दोन्ही विभागात आपले विशेष स्थान प्रस्थापित केले आहे. सांस्कृतिक क्षेत्रात आली वेगळी ओळख कायम राखणाऱ्या ‘संस्कृती कलादर्पण’ चा त्रीदिवसीय नाट्य महोत्सव माटुंगाच्या यशवंत नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. शेवग्याचा शेंगा (श्री चिंतामणी), डोंट वरी बी हॅप्पी (सोनल प्रोडक्शन), ऑल दि बेस्ट २ (अनामय निर्मित), परफेक्ट मिस मॅच (सोनल प्रोडक्शन) आणि दोन स्पेशल (अथर्व निर्मित) या नाटकाचे प्रयोग या नाट्य महोत्सवात रसिकांना पाहण्यास मिळाले. आता या पाच नाटकांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरण्याची चुरस आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अभिनेत्री स्मिता जयकर, सुप्रिया पाठारे, प्राजक्ता कुलकर्णी, मिलिंद गवळी, रवि पिल्ले, दिग्दर्शक देवेंद्र पेम यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मनसेचे नगरसेवक मनीष चव्हाण यांनीही उपस्थित राहून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
नाट्य-सिनेसृष्टीतील कलाकृतींना सन्मान मिळवून देण्यासाठी कार्य करणारी संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा अध्यक्ष अर्चना नेवरेकर आणि चंद्रकात सांडवे यांच्या संकल्पनेतून आकाराला आला आहे. यंदा ‘ऑल दि बेस्ट २’ या नाटकाने या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. भन्नाट विनोदी असलेल्या या नाटकाला रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला, त्यानंतर शेवग्याच्या शेंगा या नाटकाचा प्रयोग रंगला. महोत्सवाच्या इतर दोन दिवशी तिन्हीसांज, परफेक्ट मिस मॅच आणि डोंट वरी बी हॅप्पी ही नाटके सादर झाली.
नाट्य महोत्सवाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर चित्रपट महोत्सवाचीदेखील घोषणा करण्यात आली. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात ६ आणि ७ एप्रिल रोजी चित्रपट महोत्सव होणार आहे. यंदाच्या वर्षी चित्रपट विभागात तब्बल ६४ चित्रपटांची नोंदणी झाली होती. त्यांपैकी नटसम्राट, ख्वाडा, हलाल, मितवा, देऊळ बंद, संदूक, रंग पतंगा,कोती, डबल सीट, दगडी चाळ आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांनी पहिल्या अकरात बाजी मारली आहे. चित्रपट विभागातील ज्युरी मंडळात असलेल्या श्रावणी देवधर, दीपक देऊळकर, समृद्धी पोरे, अभिजित पानसे, अमित भंडारी आणि अमृता राव यांनी निवड झालेल्या चित्रपटांचे परिक्षण केले आहे.
विशेष म्हणजे या महोत्सवाच्या यंदाच्या १६ व्या वर्षी नाटकांचे परीक्षण करण्यासाठी परीक्षकांसोबत नाट्यरसिकांनाही मतदान करण्याची संधी मिळत आहे, तसेच या संपूर्ण महोत्सवातून जमलेला निधी ‘नाम’ फाउंडेशनला देण्यात येईल, असे संस्थेचे अध्यक्ष अर्चना नेवरेकर आणि चंद्रशेखर सांडवे यांनी सांगितले