‘प्रशासनातील लक्षवेधी साहित्यनिर्मिती’ विषयावर चर्चासत्र
पुणे : लिखाणाची उर्मी, आवड असल्याने मनातील विचार कागदावर उमटत गेले. गुन्ह्यांची उकल करताना गुन्हेगारी समाजाचा खरा चेहरा समोर आला. वाईट वर्तणुकीच्या लोकांपासून समाजाचे रक्षण व्हावे; सुदृढ, सुसंस्कृत समाजाची निर्मिती व्हावी या हेतूने लिखाण करीत गेला, अशा भावना पोलिस महानिरिक्षक बी. जी. शेखर यांनी व्यक्त केल्या. संताजीवरील साहित्यकृतीला परवानगी मिळण्यासाठी या पुस्तकाचा दस्तावेज सुमारे सहा महिने विविध शासकीय विभागांमधून फिरला, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात ‘प्रशासनातील लक्षवेधी साहित्यनिर्मिती’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन आज (दि. 21) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेखर यांनी लेखनप्रवासाचा पट उलगडला. यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांचाही यात सहभाग होता. त्यांच्याशी पुणे महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांनी संवाद साधला.
शेखर पुढे म्हणाले, लेखन करताना काल्पनिक कादंबरी, सत्य घटनेवर आधारित लेखन, इतिहासाची आवड व संशोधक वृत्ती असल्याने ऐतिहासिक तसेच पोलिस खात्यात कार्यरत असल्याने गुन्हेविश्वावरही लेखन केले आहे.
शेखर गायकवाड म्हणाले, अस्सल अनुभव आणि कल्पक लेखन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनुभवातून झालेले लेखन अधिक सकस वाटते तसेच या प्रकारचे लिखाण अधिक टिकावू असल्याचे जाणवले. यातूनच अनुभवांवर आधारित वस्तुनिष्ठ साहित्यकृती माझ्या हातून निर्माण झाल्या. सर्वसामान्यांच्या कुटुंबातील एका खेडेगावात राहणारा मी अतिशय उत्तम शिक्षक लाभल्याने घडत गेला. लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड असल्याने सहावीत असतानाच शंभरहून अधिक पुस्तकांचे वाचन केले. या आवडीचा उपयोग स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासावेळी झाला. दरवर्षी एक पुस्तक लिखाणाचा संकल्प केला असून संशोधनात्मक लेखन, शासकीय कामकाजावेळी आलेले अनुभव, पुढारीशाही लोकशाही यावर भविष्यकाळात लिखाण करण्याचा मानस आहे. अशा प्रकारच्या संमेलनांमध्ये तरुण अधिकाऱ्यांचा समावेश व्हावा तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण पुस्तकांची निर्मिती व्हावी, त्यांचे इंग्रजीत भाषांतर व्हावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.