पुणे – साहित्य संमेलन भरवणे हे रिकामटेकड्यांचा उद्योग आहे. साहित्य संमेलनांमधून केवळ चर्चा होत असून, पुढे काहीच होत नाही, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आज (शुक्रवार) केली आहे. समता दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे नेमाडे यांना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या हस्ते महात्मा फुले समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, “साहित्य संमेलन भरवणे हा केवळ रिकामटेकड्यांचा उद्योग झाला आहे. संमेलनासाठी राजकीय व्यक्तींकडून पैसा घेतला जातो, उद्या शत्रूकडूनही पैसा घेतला जाईल. संमेलनावर चर्चा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. शहाणपणाला मर्यादा असते, पण मूर्खपणाची काही हद्द नसते.‘ महात्मा फुले, शाहू-डॉ. आंबेडकर यांना सध्याच्या राजकारणात पडीक दिवस आले आहेत. राजकारणात असे दिवस येतात; परंतु खरे विचारवंत हे त्यांच्या पायाशी कायम असतात. त्यामुळे राजकारणविरहित महात्मा फुले यांच्या कार्याचा विचार झाला पाहिजे,‘ असे मत नेमाडे यांनी या वेळी व्यक्त केले.
‘नुसते पुतळे आणि तसबीरमध्ये महात्मा फुले यांना कोंडून ठेवणे योग्य नाही. ते सर्वांचे होते. त्यांनी सर्वाधिक काम हे ब्राह्मणांसाठी केले. ब्राह्मण समाजाने त्यांना आपले मानले तर त्यात गैर काय. नुसते नामस्मरण करणे योग्य नाही. नामस्मरण करण्यास फुले यांचाही विरोध होता. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन खेडोपाड्यात आणि तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची गरज आहे. तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल,‘‘ असेही नेमाडे म्हणाले. दरम्यान, एका प्रश्नाला उत्तर देताना नेमाडे यांनी मातृभाषा नीट आलीच पाहिजे. एवढेच नव्हे, तर स्वप्नेदेखील मराठीच पडली पाहिजेत. आधी घरात मराठी ठीक करा. शेतकऱ्यांची मुले मुख्यमंत्री होतात; परंतु मराठीसाठी ते काय करतात. कर्नाटकात नाही चालत असे; मग महाराष्ट्रात मराठीपेक्षा इंग्रजीला महत्त्व का? इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुदळे यांनी, तर सूत्रसंचालन विजय लडकत यांनी केले. प्रीतेश गवळी यांनी आभार मानले.

