पिंपरी,पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातील पहिल्याच ‘साहित्य मित्र’ या मोबाईल ऍपचे लोकार्पण सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक अच्युत गोडबोले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनिल महाजन, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापिठाचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील यावेळी उपस्थित होते.
तसेच ८९व्या साहित्य संमेलनासाठी महराष्ट्र सरकारने दिलेला २५ लाख रकमेचा धनादेश महामंडळाच्या वतीने डॉ. माधवी वैद्य यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.
‘साहित्य मित्र’ या ऍपची संकल्पना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांची असून या ऍपची निर्मिती संतोष देशपांडे यांनी केली आहे. जगभरात पसरलेल्या तरुणांशी थेट जोडले जाणारे हे ऍप मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती त्यांच्यापर्यंत नेण्यात नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास डॉ. सोमनाथ पाटील यांनी व्यक्त केला. ९० टक्के तरुणांकडे आज स्मार्ट फोन किंवा ऍण्ड्रॉइड फोन असल्यामुळे केवळ बटण दाबून त्याना मराठी भाषा समजावून घेता येईल. ऍपमधील ‘शद्बांगण’ या विभागात मराठीतील अवघड शद्बांची ओळख करून देण्यात येणार आहे. तसेच त्यात ८९ व्या साहित्य संमेलनाची माहिती, बातम्या, फोटो आणि व्हिडिओ यांची अद्ययावत माहिती घेता येईल.
गोडबोले यांनी या ऍपचे तांत्रिक महत्व मोठे असल्याचे स्पष्ट करताना सांगितले की, मराठी साहित्य हे केवळ कागदावर वा पुस्तकात लिहिण्याची वा छापण्याची गोष्ट राहिली नसून ती सवय आता कमी होत जाणार असल्याचे ते चिन्ह आहे. मोबाईलवरील लिखाणात चांगले साहित्यही निर्माण होत आहे. पूर्वीचा बोरु, पार्कर पेन वा की बोर्ड ही शद्बकळेला तंत्रज्ञानाची मिळालेली जोड आहे. तंत्रज्ञान बदलले तरी साहित्याचा दर्जा बदलणार नाही, कारण त्यासाठी लेखकाला अनुभवाची व प्रतिभेची जोड असावी लागते. हे संमेलन वयोवृद्धांसाठी नसून ते तरुणांशी या ऍपद्वारे जोडले जात असल्याने त्यांनीही साहित्यनिर्मितीत उतरावे, असे आवाहन गोडबोले यांनी केले.
डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, सरकारने धनादेश देऊन साहित्याला राजाश्रय दिला असून आता लोकाश्रयासाठी भावी पिढीच्याहाती तो सोपवणे ही काळाची गरज आहे. तरुणांपर्यंत साहित्य जाण्यासाठी ते तरुणांच्या भाषेत जायला हवे. साहित्यमंथनातून निघणार्या सर्व भल्या बुर्या गोष्टींचा समन्वय तरुणांना आपलेसे करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डोळ्यात स्वप्ने तरळणार्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत करून या ऍपच्या माध्यमातून मराठी भाषेचे जगाशी नाते जोडले आहे. ही बाब महामंडळलाही अभिमानाची वाटते, असे डॉ. वैद्य म्हणाल्या. याशिवाय मराठी भाषेचे अध्यासन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात सुरू होणे हे ८९व्या साहित्य संमेलनाचे फलीत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, इतिहास, देहू व आळंदी यामध्ये वसलेल्या पिंपरी-चिंचवडचा सर्वंकश परिणाम या संमेलनावर होईल.
ऍपच्या या लोकार्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले, तर संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांनी आभार मानले.
साहित्य मित्र ऍप कसे वापराल?
* साहित्य मित्र ऍप ऍण्ड्राईड, आयपॉड व आयफोन वरुन डाऊनलोड करता येईल.
* डाऊनलोड भागात संमेलनाचे बोधचिन्ह, ऍनिमेशन, जिंगल, प्रतिनिधी नोंदणी, अर्ज, माहितीपत्र डाऊनलोड करता येईल.
* विविध प्रकारचे ऍलर्ट्स व नोटिफिकेशन यातून प्रसारित करण्यात येतील.
* ऍपच्या माध्यमातून ८९व्या साहित्य संमेलनाशी संलग्न असणारी सर्व अद्ययावत माहिती, बातम्या, फोटो व व्हिडिओ पाहाता येतील.
* विविध कार्यक‘मांची माहिती तसेच संमेलनस्थळाचा नकाशा व संलग्न माहितीचा खजिना व सुटसुटीत मांडणी.
*े ऍपमधील शद्बांगण या विभागात दररोज ज्ञान अज्ञान ही प्रश्नमंजूषा मराठी भाषा, साहित्य व संस्कृती तसेच सामान्य ज्ञानासाठी यावर विचारलेल्या पाच प्रश्नांना उत्तरे द्यायची आहेत.
* शद्बभेट या विभागत रोज वेगळ्या मराठी शद्बाची ओळख करून घेताना मराठीतील शब्दसंग‘ह वाढवण्यास मदत होईल.
* या ऍपचा केवळ संमेलनासाठी नव्हे तर भविष्यातही संवाद साधण्यासाठी प्रयत्न राहून आपली तरुणाई मायमराठीच्या आणखी जवळ यावी यासाठी उपयोग केला जाईल.