मुंबईः अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री त्याची धाकटी बहीण अर्पिताच्या लग्नानिमित्त संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी शाहरुख खानने देखील हजेरी लावली . शाहरुखने अर्पिताला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सलमान खानचे भावोजी आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांनी शाहरुख आणि सलमानचे अर्पितासोबतचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. या छायाचित्रात शाहरुख आणि सलमान अर्पिताला शुभेच्छा देताना दिसत आहेत. मंगळवारी हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता तिचा बॉयफ्रेंड आयुषसोबत लग्नगाठीत अडकणार आहे.
अलीकडेच दिल्लीत गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रविवारी मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम झाला. यावेळी खान कुटुंब वास्तव्याला असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर फुलांची सजावट रोशनाई करण्यात आली होती.
अर्पिताचा मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम खासगी होता. यामध्ये खान कुटुंबाचे निवडक मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. एकीकडे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अर्पिताचा मेंदीचा कार्यक्रम सुरु असताना दुसरीकडे बाहेर सलमानच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. गॅलेक्सीसमोरचा रोड जाम झाला होता. सलमानचे बॉडीगार्ड्स गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईतील वांद्रास्थित हॉटेल ताजमध्ये अर्पितासाठी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकार सहभागी झाले होते.