लोणावळा – कसलेही नियोजन न करता मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णयामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. स्वतःच्या बॅंकेत पैसे असूनही ते काढता येत नसल्याने सरकारने नागरिकांना “कॅशलेस’ केले आहे, अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यंत्री अजित पवार यांनी केली. तसेच, काळा पैसा व भ्रष्टाचाराला विरोध नाही, मात्र अविचाराने घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य नागरिक हतबल झाला आहे, असेही ते म्हणाले.
लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लोणावळा गुरुद्वारा चौकात आयोजित जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. स्वाभिमानी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, नगराध्यक्ष अमित गवळी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, निरीक्षक राजेंद्र खांदवे, तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, मानसिंग पानचुंदकर, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गुंड, शहराध्यक्ष राजु बोराटी, रमेशचंद्र नय्यर, बाळासाहेब पायगुडे, शामराव पाळेकर, अरुणकाका मोरे, विठ्ठलराव शिंदे, साहेब टकले, नारायण पाळेकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शालिनी अमित गवळी व नगरसवेक पदाचे उमेदवार उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शहराचा विकास साधण्यासाठी शासनाने नगरपरिषदांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याची गरज आहे. केवळ जनतेच्या कराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशांवर शहरांचा विकास होऊ शकत नाही. केंद्र व राज्य शासनाचा निधी, सीएसआर, बीओटी, एसआरए, घरकुल योजना आदींच्या माध्यमातून हा विकास साधणे गरजेचे आहे. गेल्या सव्वादोन वर्षाच्या कार्यकाळात केंद्रात व राज्यात भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केवळ बनवाबनवी व लोकप्रिय घोषणा करत नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत आहे. नोटा बंदीच्या निर्णयाला एक महिना झाला तरी बॅंकांसमोरील रांगा कमी होत नाहीत. जिल्हा सहकारी बॅकांच्या व्यवहारांवर बंदी घातली, यामुळे देशभरातील शेतकरी मोडला आहे आणि जर शेतकरी मोडला तर, देश मोडल्या शिवाय राहणार नाही, ग्रामीण भागात परिस्थिती नाजुक आहे, खते, बियाणे घेण्यासाठी जाणारा शेतकरी कसा कॅशलेस व्यवहार करणार कसा, केंद्रातील भाजपा नेत्यांना व्यवहार कळते की नाही, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला.
अमेरिका ही महासत्ताक आहे. तेथे देखील 40 टक्के व्यवहार रोखीने चालतात. हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद करताना दाखवलेली स्वप्न मृगजळ होते. भाजपा सर्वत्र बनवाबनवी करत आहे. त्यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत. त्यांच्या पोटात एक व ओठात एक असते, मराठा आरक्षणाबाबत सुद्धा भाजपा सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली. मराठी मोर्चाच्या विरोधात इतर मोर्चे सुरू केले, या देशात व राज्यात कोणताही घटक आज समाधानी नाही. सर्व लहान मोठे व्यवसाय करणारे लोक अडचणी सापडले आहेत, असे असताना भाजपा सरकार रोज काही तरी घोषणा करत नागरिकांना फसवत आहे, असल्याची कोपरखळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारली.
सरकारने नागरिकांना “कॅशलेस’ बनविले – अजित पवार
Date: