पुणे: पोलीस स्टेशन्स समाजातील सर्व घटकांना आधाराची केंद्र वाटायला हवीत, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.
विमाननगर येथे विमाननगर पोलीस चौकी आणि पारपत्र पडताळणी कक्षाचे उदघाटन आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जगदीश मुळीक, पोलीस आयुक्त के.के. पाठक, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, उपायुक्त पोलीस सुधीर हिरेमठ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले, ‘पुणे शहर जागतिक स्तरावरील शहर होत आहे. शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. पण या आव्हानावर मात करण्यासाठी पोलिसांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवण्यावर शासनाचा भर आहे.’
पोलीस स्टेशन्समध्ये येण्यास नागरिक उत्सुक नसतात. पण नागरिकांत पोलीस स्टेशन्सबाबतची ही प्रतिमा बदलायला हवी. पोलीस स्टेशन्स आधाराची आणि मदतीची केंद्रे वाटायला हवीत. नागरिकांना पोलीस स्टेशन्समध्ये येताना कोणत्याही प्रकारची साशंकता वाटता कामा नये. त्यांना आधार वाटायला हवा, असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनात स्मार्टनेस येत आहे. कामकाजात गतिमानता येण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. व्हिजिबल पोलिसिंग संकल्पना पुण्यात रुजायला हवी. त्यासाठी आवश्यक मदत आणि सुविधा पोलिसांना दिल्या जातील, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
आमदार जगदीश मुळीक यांनी ‘नव्या पोलीस स्टेशनमुळे नागरिकांची सोय होणार आहे. नागरिकांना पारपत्राच्या पडताळणीसाठी आता जवळच सुविधा निर्माण झाली आहे, असे सांगितले.
पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राहील याकडे पुरेपूर लक्ष दिले जात आहे. गेल्या काही दिवसात साखळी चोरांविरुद्ध धडक मोहीम उघडली असल्याचे सांगितले.
पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी प्रास्ताविक केले तर उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी आभार मानले.