लंडन –
समाज जीवनात हेटाळणीचा विषय ठरलेल्या समलिंगी संबंधांतून होणाऱ्या विवाहांना जनमताच्या माध्यमातून मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला आहे. या देशातील ६२ टक्के जनतेने समलिंगी विवाहांच्या बाजूनं कौल दिला असून आयर्लंडच्या जनतेचा हा निर्णय कट्टर विचारसरणीच्या कॅथॉलिक चर्चला धक्का मानला जात आहे.
समलिंगी जोडप्यांना विवाहास मान्यता देणारी घटनादुरुस्ती आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये करावी का, या मुद्द्यावर आयर्लंडमध्ये जनमत घेण्यात आलं होतं. देशातील ४३ पैकी ४० क्षेत्रांतून या मुद्द्यावर लोकांनी मतं मांडली. यामध्ये समलिंगी विवाहास मान्यता देण्याच्या म्हणजेच, ‘येस’च्या बाजूने ६२.३ टक्के मते मिळाली. ‘नो’ गटातील प्रमुख नेत्यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
आयर्लंडमध्ये १९९३मध्ये समलिंगी संबंधांना मान्यता देण्यात आली होती. तर २०१०मध्ये त्या देशाने समलिंगी जोडप्यांना ‘नागरी साहचर्य’ म्हणून मान्यता दिली. मात्र, नागरी साहचर्य आणि विवाह यामध्ये मूलभूत फरक असून विवाहाला राज्यघटनेचे संरक्षण आहे. तर नागरी साहचर्याला घटनेचे संरक्षण नाही. समलिंगी जोडप्यांना घटनेचे संरक्षण देण्यासाठी जनमताचा आधार घेण्यात आला.