पुणे :
‘राजकीय पक्ष हे समाजाचे बाप नाहीत. तर समाजाच त्यांचा बाप आहे. एक पोर बिघडले, तर समाज दुसर्या पोराला सत्तेवर आणते. तोही बिघडत असेल तर समाज तिसर्या पोराला सत्तेवर आणेल, हे लक्षात घेतले पाहिजे.’ असे मत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
‘सत्याग्रही विचारधारा’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभा प्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम इतिहास संशोधक मंडळ सभागृह, सदाशिव पेठ येथे बुधवारी झाला. याप्रसंगी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजा दीक्षित, ‘सत्याग्रही विचारधारा’चे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी, उर्मिला सप्तर्षी, युक्रांदचे संदीप बर्वे, अंजली सोमण, सत्यशील देशपांडे उपस्थितीत होते.
‘धार्मिक आणि आर्थिक भ्रष्टाचाराने देश पोखरून निघत आहे. आर्थिक भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठीचे उपाय शोधता येतील, परंतु देशात सध्या फोफावणार्या धार्मिक भ्रष्टाचाराचे काय? हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे’, असे मत सिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी व्यक्त केले.
डॉ. राजा दीक्षित म्हणाले, ‘देशातील सद्य:स्थिती पाहता पुढील काळ पुरोगामी चळवळीसाठी खडतर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच नागरी समाजाचे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा. जनतेचा दबाव गट निर्माण व्हायला हवा. त्यासाठी लोकशिक्षण आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवनाला नैतिकतेची बैठक हवी.’

