सातारा हिल मॅरेथॉनसाठी प्रशासनाने सज्ज रहावे
सातारा (जिमाका) : 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 10 या कालावधीत सातारा हिल मॅरेथॉन 2015 होणार आहे. या स्पर्धेसाठी देश विदेशातील सुमारे 5 हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धकांना अडथळा विरहित मार्ग मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी जबाबदारीने कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी देतानाच कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांनी या दिवशी 10 नंतर पर्यटनासाठी यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
सातारा हिल मॅरेथॉन 2015 बाबत आज जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, प्रांताधिकारी मल्लीकार्जुन माने, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, मुख्याधिकारी अभिजीत बापट, सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. संदीप काटे, कमलेश पिसाळ आदींसह सदस्य उपस्थित होते.
असोसिएशनचे डॉ. काटे आणि श्री. पिसाळ यांनी मॅरेथॉन विषयी माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी संबंधित विभागांचा आढावा घेतला. ते म्हणाले, स्पर्धा मार्गावरील सर्व खड्डे भरुन घ्यावेत. त्याचबरोबर स्वच्छता ठेवावी. जंतुनाशक औषधांची फवारणी करावी. मार्गावरील सर्व पथ दिव्यांची दुरुस्ती करुन घ्यावी. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नगर परिषदेने क्रेन उपलब्ध करुन द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पर्धा मार्गावरील रस्ता दुरुस्त करावा. पोलीसांनी स्पर्धा मार्गावर चोख बंदोबस्त ठेवावा. त्याचबरोबर सकाळी 5 वाजल्यापासून स्पर्धा मार्गावरील येणारी वाहतूक बंद ठेवावी. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरणावेळी आवश्यक ती कार्यवाही चोखपणे करावी.
6 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने या दिवशी विकेंड साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कास पठारावर पर्यटनासाठी येत असतात. यासाठी वन विभागाने कास पठरावर येणाऱ्या पर्यटकांचे ज्यांचे आदीच बुकींग झाले आहे. त्यांना रविवारी सकाळी 10 नंतर येण्याबाबत सूचना द्यावी. तसेच पर्यटकांच्या माहितीसाठी वन विभागाच्या संकेतस्थळावर याविषयी माहिती प्रदर्शित करावी, अशी सूचनाही श्री. मुद्गल यांनी देऊन, पर्यटकांनी सदर दिवशी सकाळी 10 नंतरच पर्यटनासाठी कास पठाराकडे यावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाने बामणोली, केळवली, परळी आदी ठिकाणी मुक्कामी असलेल्या गाड्या वेळापत्रकानुसार न सोडता सदर दिवशी स्पर्धा संपल्यानंतर सोडाव्यात. जिल्हा परिषदेने चल स्वच्छता गृहे शुल्क भरुन स्पर्धा कालावधीत उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून मॅरेथॉन असोसिएशन तर्फे रुग्णवाहिकेची सुविधा करावी. प्रशासनाच्यावतीने रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वयंसेवक जागोजागी ठेवून तशा सूचना त्यांना देण्यात याव्यात.
या मॅरेथॉनसाठी परदेशातूनही स्पर्धक येणार आहेत. ही मेरेथॉन यशस्वी करण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी, असेही श्री. मुद्गल शेवटी म्हणाले.