ग्यानबा तुकाराम साहित्य नगरी, पिंपरी, पुणे ता. 18: कोणत्याही गोष्टीवर टीका करणे सोपे असते, पण सकारात्मक विचारातून प्रश्नांना उत्तरे देणे किंवा मार्ग सुचवणे हेच आपल्या लेखनातील सूत्र आहे. जीवनाकडे पाहाण्याचे हे सूत्र आपल्या कादंबर्यातून मांडत असल्यामुळेच वाचकांना ते आवडत असावे. तसेच यासाठी शब्दांचा जाबाबदारीने केलेला वापर हेही लेखकाने स्वत:वर लादून घेतलेले बंधन असायला हवे, असे तरुण वर्गाचा लाडके आयकॉन व लोकप्रीय लेखक चेतन भगत यांनी सांगितले. आतापर्यंत हजेरी लावलेल्या साहित्य संमेलनातील पिंपरीचे संमेलन सर्वात माठे असल्याची कबूलीही चेतन यांनी दिली. ही आठवण मनात कायम राहावी यासाठी त्यांनी मंचावरुन प्रेक्षकांच्या पार्श्वभूमीवर सेल्फी फोटोही काढला!
साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या इतिहासात चेतन भगत सारख्या राष्ट्रीय पातळीवरील तरुण वर्गाच्या गळ्यातला लाडका ताईत बनलेला लेखक प्रथमच मंचावर आणला जात असल्याबद्दल स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. पाटील यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. भाग्यश्री तसेच दोन्ही सुपुत्र डॉ. सोमनाथ आणि यशराज यांनी भगत यांचा मंचावर सत्कार केला. चेतन जोशी आणि यशराज पाटील यांनी भगत यांच्याशी संवाद साधला.
जबाबदारीने लिहिण्याच्या मुद्यासंबंधी बोलताना भगत म्हणाले की, आपल्या पुस्तकात आपण अमली पदार्थ, अनावश्यक झगमगट जाणींवपूर्वक टाळला असून रोजच्या जगण्यात जे घडते तेच मी जबाबदारीने लिहितो. यातून आपल्याला एक लोकप्रीय लेखक म्हणून मोठे वलय प्राप्त झाले असले तरीही किमान लहान मुलांचा विचार करून मी जबाबदारीने शब्दांचा वापर माझ्या लेखनातून करतो. फेसबुकचा वापर करणार्या तरुण वर्गानेही शब्दांचा वापर जबाबदारीनेच करायला हवा, असेही भगत म्हणाले.
फाईव्ह पॉईंट समवन आणि टू स्टेट्स या दोन कादंबर्या या आपल्या वैयक्तिक जीवनाशी साधर्म्य असणार्या असून आपल्या लेखनात आर्धे सत्य आणि आर्धा कल्पनाविलास असतो, असे भगत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
पुरस्कार वापसी ही एक फॅशन बनली आहे, असे मत नोंदवून भगत म्हणाले की, मला कोणताही पुरस्कार मिळाला नाही त्यामुळे तो परत करण्याचा प्रश्नच येत नाही, पण वाचकांचे जे उदंड प्रेम मिळाले आहे ते मात्र मी कदापिही परत करणार नाही, या वाक्यावर उपस्थित तरुण वर्गाने जल्लोश केला.
लोकांच्या निरिक्षणानुसार आपण लहानपणी एक सर्वसाधारण मुलगा असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. पण आपण स्वत:कडे गंभीरपणे पाहाताना तसे नाही हे लक्षात आल्यावर आयआयटीमधून इजिनीयरची पदवी घेतली आणि बँकेतील चांगली नोकरीही मिळवली. त्यातून लोकांना त्यांचे निरीक्षण बदलावे लागले. आयुष्य हे एकदाच मिळत असल्यामुळे लेखक व्हायचे स्वप्नही आपण त्यानंतर लगेच पूर्ण करण्याचा ध्यास घेतला, असे भगत यांनी सांगितले.
बँकेतील नोकरीच्या काळात फाईव्ह पॉईंट समवन, थ्री मिस्टेक्स इन माय लाईफ आणि वन नाईट इन कॉल सेंटर या तीन कादंबर्या लिहिल्या. त्यांना चांगली लोकमान्यता मिळाल्यानंतर मगच आपण बँकेतील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. भगत पुढे म्हणाले की, लेखक कुणीही बनू शकतो पण वाचकांच्या जीवनावर परिणाम करणारे लेखन हेच जास्त काळ टिकते. सिनेमातही नायकापेक्षा जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे स्वामी विवेकानंदच लोकांच्या अंतरंगात दीर्घकाळ ठसा उमटवतात. तसेच चांगला लेखक स्वत:चा स्वतंत्र ठसा वाचकाच्या मनावर उमटवत असतो, असेही त्यांनी सांगितले.
टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडिया यामुळे तरुण पिढी विचलीत झाली असून या तिन्हीचा मर्यादित वापर केला तर ते पुस्तक वाचनाकडे वळतील. त्यातून त्यांची सर्जनशीलता आणि एकाग्रता वाढायलाही खूप मदत होईल, असेही ते म्हणाले.
एका तरुणीच्या आवाजात आपण आपली पुढची कादंबरी लिहित असून तिच्या मनात शिरुन ती काय विचार करत असेल याचे नाट्यच या कादांबरीतून मांडणार आहोत, असे भगत यांनी सांगितले.