पुणे-
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे सामाजिक न्याय दिनानिमित्त “शिव-शाहू सन्मान पुरस्कार‘ वितरण सोहळा आयोजित केला होता. या वेळी महापौर दत्तात्रेय धनकवडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, अप्पा रेणुसे, विशाल तांबे, बाळासाहेब बोडके व संयोजक विकास पासलकर उपस्थित होते.राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख व शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना “राजर्षी शाहू महाराज पुरस्कार‘ देण्यात आला.
कोल्हापूरसह विविध ठिकाणी राबविलेल्या सरकारी योजना आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा उल्लेख देशमुख यांनी केला. ते म्हणाले, “”प्राथमिक शिक्षण व जलसंवर्धनावर जास्त भर दिला. राज्य सरकारने पाच हजार गावे जलयुक्त शिवार योजनेमध्ये आणली आहेत; परंतु आजही अनेक गावांमध्ये जलसंवर्धन आणि चांगले शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजे. सध्याच्या काळात आपण आपले काम चांगले करणे, हीच खरी देशभक्ती आहे.‘‘
धनकवडे म्हणाले, “डेक्कन येथील संभाजी पुतळ्याची उंची वाढविणे, संभाजी उद्यानामध्ये चौथऱ्यावर संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबरोबरच बाहेरगावाहून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याची संभाजी ब्रिगेडने केलेली मागणी पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू.‘‘
दत्ता कोहिनकर, कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील, महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी संदीप ढोले यांना विशेष सन्मान; तर नितीन सातव, अभयसिंह धाडवे, अरविंद कणसे, मेघराज राजेभोसले, बाळासाहेब पासलकर, प्रवीण माने, सचिन निकम, रामदास माने यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले.
संभाजी ब्रिगेडचा “शिव-शाहू सन्मान पुरस्कार‘ वितरण सोहळा संपन्न
Date:


