उस्मानाबाद: शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही पूर्णपणे भरुन गेली होती. मात्र, विविध यंत्रणा, मंदिर संस्थान आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवून भाविकांना सुलभपणे दर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले.
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री देवीजींचे या रुपातील दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. पाचव्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे.
दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांना चांगल्या पद्धतीने दर्शन मिळावे, यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा यांनी समन्वयाने या गर्दीचे नियंत्रण केले. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस प्रमुख अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे-घाटे, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी सातत्याने ठिकठिकाणी भेटी देऊन प्रत्येक ठिकाणी भाविकांना त्रास होणार नाही, यापद्धतीने यंत्रणांना सूचना देत होते.
महाद्वार, मंदिरातील पोलीस चौकी येथून वारंवार भाविकांना सूचना दिल्या जात होत्या. ज्या भाविकांची चुकामूक झाली, त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ ध्वनीक्षेपकावरुन कळवून पोलीस चौकी अथवा मदत केंद्रांत येण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे अनेक भाविकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. राज्याच्या अनेक भागातून भाविक खासगी गाड्यांनीही तुळजापूर येथे येत आहेत. त्यांच्या गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहनांना प्रवेश नसल्याने भाविकांना ये-जा करणे सुलभ होत आहे.
दरम्यान काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या (दि. 19) श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.