मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वानखेडे मैदानावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याच्या 18 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यासह एकूण आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. वानखेडे स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये लालकृष्ण अडवानी, भाजपशासित राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, चंद्राबाबू नायडू, तसेच अनेक आध्यात्मिक गुरू व इतर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे-पालवे, विष्णू रामा सवरा, या कॅबिनेट मंत्र्यांसह दिलीप कांबळे व विद्या ठाकूर या राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. विनोद तावडे यांनी आईच्याही नावाचा आवर्जून उल्लेख करीत विनोद श्रीधर विजया तावडे या नावाने शपथ घेतली. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत सत्तेवर आलेल्या भाजपने शपथविधीसाठी वानखेडे मैदानावर दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते. सोहळ्यासाठी मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. राज्यातील सर्व क्षेत्रातील दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वानखेडे मैदानावर आगमन होताच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सावरा यांनी मंत्रिपदाची तर दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रगीतानेच कार्यक्रमाची सांगता झाली. त्याआधी महाराष्ट्राची लोककला दर्शवणा-या गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. अशोक हांडे यांच्या मराठी बाणा कार्यक्रमाच्या कला पथकातील कलाकार याचे सादरीकरण केले. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशभरातील साधुसंत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हरियाणा सरकारच्या शपथविधी सोहळ्यालाही अशाच प्रकारे साधुसंतांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सर्व साधुसंतांसाठी खास वेगळी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी स्टेज आणि कार्यक्रमाच्या स्थळाच्या सजावटीची आणि संकल्पनेची जबाबदारी भव्य दिव्य सोहळ्यांच्या कला दिग्दर्शनात हातखंडा असलेल्या प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई म्हणजेच एन.डी.देसाई यांच्यावर होती. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार प्राचीन आणि आधुनिक महाराष्ट्राची सांगड घालणारा सोहळा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
वानखेडे स्टेडियमवर दुपारी चार वाजून २० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व्यासपीठावर आले. या सोहळ्यासाठी मोदी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, वेंकय्या नायडू, निर्मला सीतारामन उपस्थित होते. त्याचबरोबर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदींसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण; तसेच छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.
भाजपचे घटक पक्ष असलेले रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटेही उपस्थित होते. त्यांच्याबरोबर विविध धर्मांचे प्रमुख, संत, साधू उपस्थित होते. त्यात शांतीमहाराज, नरेंद्रमहाराज, प्रल्हाद वामनराव पै, अनिरुद्धबापू, अप्पा धर्माधिकारी, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज, अच्च्युतानंद सरस्वती, जगतगुरू शंकराचार्य, अंजनगाव सुर्जीचे जितेंद्र महाराज, ख्रिस्ती धर्मगुरू, मुस्लिम मौलवी आदी उपस्थित होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल, अभिनेते विवेक ओबेराय, रमेश देव, अजिंक्य देव, सीमा देव आदी उपस्थित होते. अभिनेते नाना पाटेकर आले आणि थोड्या वेळात गर्दीतून वाट काढता न आल्याने निघून गेले. वानखेडेवर उसळलेल्या गर्दीमुळे बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी रस्ता मोकळा करा, अशी घोषणा माजी आमदार मधू चव्हाण यांनी केली. उद्योगपती आदी गोदरेज, ‘सकाळ’ वृत्तसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी आदी उपस्थित होते. रिलायन्स उद्योगसमूहाचे अनिल अंबानी यांना मात्र गर्दीमुळे जागा मिळू शकली नाही.
शाही थाटामाटा त देवेंद्रराज सुरु…
Date: