पुणे- ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका मंजुषा पाटील यांच्या शास्त्रीय व अभंगाच्या मैफलीने रसिकांना
अक्षरश: चिंब केले. रसिकांनी वाह..वाह करत व टाळ्या वाजवून दिलेली साथ यामुळे शनिवार वाड्याचा
परिसर दुमदुमून गेला.
शनिवारवाडा कला महोत्वाचे दुसरे पुष्प आज मंजुषा पाटील यांनी गुंफले. ऋतुजा जुन्नरकर हिच्या गणेश
वंदनाने आजच्या मैफलीचा प्रारंभ झाला. त्यानंतर मंजुषा पाटील यांनी विविध रागातील सादर केलेल्या
बंदिशी व अभंगांनी संपूर्ण शनिवार वाड्याचा परिसर शास्त्रीय गायनाने आणि अभंगांनी भारावून गेला.
मंजुषा पाटील यांनी प्रथम राग ‘श्री’ सादर केला. त्यांनी विलंबित तिलवाडा तालातील बंदीश व द्रुत बंदीश
सादर केली. रसिकांनी त्याला टाळ्या वाजवून दाद दिली. त्यानंतर ‘कौन गली गयो शाम ही ठुमरी व ‘म्हारे
घर आवो जी..’ ही मीराबाईंची रचना सादर केली. त्यांनी गायलेल्या ‘रूप पाहता लोचनी…’, ‘अवघे गरजे
पंढरपूर…’, अबीर गुलाल उधळीत रंग…’ आणि जोहार मायबाप .. यांसारख्या अभंगांनी संपूर्ण वातावरण
भक्तिमय झाले होते.
मंजुषा पाटील यांना तबल्याची साथ विभव खांडोळकर यांनी, पखवाजची साथ गणेश पापल यांनी,
हार्मोनियमची साथ श्रीराम सबनीस यांनी, तानपुऱ्याची साथ अनघा परळीकर , सावनी व रसिका यांनी दिली.
कार्यक्रमाचे निवेदन अभिजीत कुलकर्णी यांनी केले. महोत्सवाचे संयोजक आमदार विजय काळे यांच्या हस्ते सर्व
कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
उद्या (शनिवार) या महोत्सवाचा समारोप होणार असून संध्याकाळी ६.६० वाजता शनिवारवाडा येथे
‘जिव्हाळा’ निर्मित विनोदी नाटक सुनेच्या राशीला सासू हे नाटक सादर करण्यात येणार आहे.