‘व्हॉट अबाऊट सावरकर?’च्या टीमने कशी साजरी केली होळी… ?
अनिष्ट रुढींचे दहन करणाऱ्या होळीच्या सणानिमित्ताने ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या आगामी चित्रपटाच्या कलाकारांनी अनोखी होळी साजरी केली. पर्यावरणाचा ढासळता समतोल पाहता इको फ्रेंडली
होळीचा पर्याय अवलंबित या चित्रपटातील कलाकार अविनाश नारकर, अतुल तोडणकर, गणेश मयेकर आणि सारा श्रवण यांनी यावेळी केर-कचरा, झाडांचा पालापाचोळा, टाकाऊ कागद-पुठ्ठे यांचे दहन केले. तसेच समाजातील वाईट चालीरीतींचा बिमोड करीत राष्ट्राविकासासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञाही केली. सावरकरांच्या देशभक्तीपर विचारांनी प्रेरित पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचा संदेश देत ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ च्या ‘टीमने साजरी केलेली ही होळी सावरकरांसाठी मानवंदनाच ठरली.
रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेनमेंट प्रस्तुत रोहित शेट्टी, अतुल परब निर्मित ‘व्हॉट अबाऊट सावरकर? या चित्रपटामध्ये सावरकरांच्या विचाराने भारावलेल्या एका ध्येयवेडया तरुणाची कथा रेखाटण्यात आली आहे. रुपेश कटारे आणि नितीन गावडे दिग्दर्शित ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.