पुणे :
‘जीवनाला हो म्हणा, व्यसनांना नाही म्हणा, व्यसनांपासून दूर रहा आणि व्यायामाला प्राधान्य द्या. आत्ताच्या पिढीला चांगला मार्ग दाखविणे गरजेचे आहे, तरूणांनी व्यसनांच्या आहारी जाऊन जीवनहानी करू नये’, असे उद्गार या अभियानाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ म्हणून झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका ‘जय मल्हार’ मधील खंडोबा ची भूमिका करणारे कलाकार देवदत्त नागे यांनी काढले.
ते आज दिनांक 29 मे रोजी ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त भव्य जनजागृती अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदीर, पुणे येथे पार पडला. कार्यक्रमावेळी तंबाखूविरोधी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच स्वाक्षरी अभियानही राबविण्यात आले.
‘व्यसनापासून आपले पाल्य दूर राहण्याकरीता पाल्यांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे, त्यांना व्यसनांपासून होणार्या हानीची जाणीव करून दिली पाहीजे, पालक आणि पाल्य यांच्यात संवाद हवा. मनाने कमकुवत असल्याचे लक्षण म्हणजे व्यसनाधिनता’ असे मत अभियानाची ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ जुई गडकरी हीने व्यक्त केले.
मंगेश तेंडुलकर बोलताना म्हणाले, ‘तरूण पिढीला लागलेल्या व्यसनाधिनतेला स्वत: तरूण आणि पालक जबाबदार आहेत. या गोष्टीचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. एकटेपणा व्यसनांचा आधार होतो म्हणून मुलांना जास्तीत जास्त वेळ द्या.’
यावेळी डॉ.अमोल कोल्हे (संपर्क प्रमुख, शिवसेना, पुणे जिल्हा), विनायक निम्हण (पुणे शहराध्यक्ष, शिवसेना), पांडुरंग बलकवडे (इतिहास संशोधक अभ्यासक), डॉ. सदानंद मोरे, मंगेश तेंडुलकर, अमर ओक, जगन्नाथ निवंगुणे (कलाकार), जुई गडकरी (अभियानाची ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’), देवदत्त नागे (अभियानाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’), मिलींद दास्ताने, नगरसेवक धनंजय जाधव, संदीप पाटील, ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सायली कुलकर्णी व आयोजक प्रसाद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
मिलींद दास्ताने आणि सहकारी यांनी तयार केलेली व्यसनमुक्ती विषयक माहितीपट कार्यक्रमप्रसंगी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलींद कुलकर्णी यांनी केले.
ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीने महिला व युवक कल्याण, कला, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात आणि विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. यावर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनामुळे होणार्या जीवनहानी बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी ‘होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ या अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्करोगाला निमंत्रण देणार्या तंबाखू/ गुटखा/ सुपारीच्या सवयींचा तत्काळ त्याग करा व सुदृढ आनंदी जीवन जगा असा संदेश या अभियानाद्वारे महाराष्ट्रभर देण्यात येणार आहे, अशी माहिती ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सायली कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात बोलताना दिली.
तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियानासाठी कार्यरत असणार्या मान्यवरांचा व तंबाखूसेवनामुळे पिडित असलेल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणार्या वैद्यकीय कर्मचार्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘पेस डी अॅडीक्शन ग्रुप’च्या डॉ. वंदना जोशी, श्री अविनाश चाबुकस्वार व सौ. अनुया चाबुकस्वार, ‘सलाम बॉम्बे फाऊंडेशन’ (पुणे) ची सहयोगी संस्था जाणीव फाऊंडेशन, डॉ. विवेक पाखमोडे, मुक्तांगण, डॉ. कल्याण गंगवाल यांचा समावेश होता.
डॉ. सदानंद मोरे, पांडूरंग बलकवडे, जगन्नाथ निवंगुणे तसेच सत्कार्थींच्या वतीने डॉ. कल्याण गंगवाल, डॉ.विवेक पाखमोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तंबाखूमुक्त महाराष्ट्र संकल्पनेतून आयोजित आंतरमहाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले तसेच त्यांच्या पोस्टरचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या अभियानात नागरीक, विद्यार्थी, गणेशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे, आणि ढोल-ताशा पथकांनीही सहभागी व्हावे. तसेच तंबाखू सोडू इच्छिणार्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. जून अखेरीस हे केंद्र सुरू होईल, ऑगस्टमध्ये हेल्पलाईन सुरू होईल, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.सायली कुलकर्णी यांनी केले.