पुणे : वीजमीटरला वेगळा उच्चदाबाचा पुरवठा जोडून डिस्प्ले बंद करून रिडींग नाहीसे करण्याची मुंढवा येथील
वाणिज्यिक वीजग्राहकाकडील क्लुप्ती महावितरणने उघडकीस आणली आहे. यात 1,01,280 युनिट्सच्या 15 लाख 87
हजार 880 रुपयांची वीजचोरी उघड झाली. याप्रकरणी रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध
सोमवारी (दि. 2) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, बंडगार्डन विभाग अंतर्गत मुंढवामधील जहागिर नगर येथे फ्लेक्स प्रिटींगसाठी अरुणा प्रवीण
लुंकड यांच्या नावे वाणिज्यिक वीजजोडणी दिलेली आहे. या वीजजोडणीचा वापर कुणाल जैन यांच्याकडून केला जात होता.
वीजवापराच्या नोंदीबाबत अनियमितता आढळून आल्यामुळे सदर ग्राहकाकडे नवीन वीजमीटर लावण्यात आले व जुने
मीटर तपासणीसाठी चाचणी विभागाला पाठविण्यात आले. तथापि फेरफार केल्याचा संशय बळावल्याने हा वीजमीटर
तपासणीसाठी नवी दिल्ली येथे पुरवठादाराकडे पाठविण्यात आला. यात महावितरणच्या वीजपुरवठ्यासह आणखी वेगळा
उच्चदाबाचा वीजपुरवठा ( ॄ ) जोडून वीजमीटरचा डिस्प्ले बंद करण्यात आल्याचे निदर्शनात आले. वीजमीटरचा रिडींग
डिस्प्ले बंद करून वीजवापराची नोंद होणार नाही या हेतुने मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याचे दिसून आले. यात
1,01,280 युनिट्सच्या 15 लाख 87 हजार 880 रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले.
या वीजचोरीप्रकरणी वीजग्राहक अरुणा प्रवीण लुंकड व वीजवापरकर्ता कुनाल जैन यांच्याविरुद्ध रास्तापेठ (पुणे)
येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 व 138 अन्वये सोमवारी (दि. 2)
गुन्हा दाखल करण्यात आला.
———————————————–


