पुणे : शहरातील महावितरणच्या पाच विभागांत वीजदेयकांपोटी फेब्रुवारीमध्ये 571 वीजग्राहकांनी दिलेले 368 चेक बाऊंस झाले असून आतापर्यंत 62 वीजग्राहकांना कारवाई करण्याबाबतची कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, एकाच चेकद्वारे अनेक ग्राहकांच्या वीजदेयकांचा भरणा होत असल्याचे दिसून आले आहे. एखाद्या व्यक्तीने अनेक वीजग्राहकांकडून रक्कम घेतल्यानंतर त्यांच्या वीजदेयकांपोटी दिलेला चेक बाऊंस झाल्यामुळे रक्कम दिल्यानंतरही वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारवाईला वीजग्राहकांना नाहक सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे.
रास्तापेठ मंडल अंतर्गत पर्वती विभागात 105, पद्मावती-107, नगररोड-80, रास्तापेठ-121 व बंडगार्डन विभागात 158 असे एकूण 368 चेक फेब्रुवारीमध्ये बाऊंस झालेले आहेत. या चेकद्वारे 571 ग्राहकांच्या वीजदेयकांपोटी 47 लाख 14 हजार 241 रुपयांचा भरणा करण्यात येणार होता. मात्र आता या सर्व वीजग्राहकांना चेक बाऊंस झाल्यानंतरचे प्रक्रिया शुल्क प्रत्येकी 350 रुपये तसेच विलंब आकार, व्याजाची रक्कम देयकाच्या रकमेसोबतच भरावी लागणार आहे.
बंडगार्डन विभागातील 62 वीजग्राहकांना चेक बाऊंस झाल्याप्रकरणी महावितरणकडून कारवाईची कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. हे सर्व 62 ग्राहकांचे चेक संबंधीत खात्यात पुरेशी रक्कम जमा नसल्याने बाऊंस झाल्याचे बँकांनी महावितरणला कळविले आहे. उर्वरित चेक बाऊंस झालेल्या संबंधीत ग्राहकांना नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
चेकद्वारे एकाच वेळी 15 ते 20 वीजग्राहकांच्या देयकांची रक्कम भरली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही व्यक्ती अनेक ग्राहकांकडून देयकांची रक्कम घेतात व दिलेला चेक बाऊंस व्हावा या हेतुने महावितरणकडे जमा करतात असे संशयास्पद चित्र दिसून येत आहे. परंतु त्याचा वीजग्राहकांना आर्थिक तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका बसत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी कोणत्याही व्यक्तीला देयकाची रक्कम देण्याऐवजी ती स्वतः वीजबील भरणा केंद्गात जमा करावी किंवा ऑनलाईन, मोबाईल अॅपद्वारे देयकांच्या रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.