विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी घटक पक्षांची वज्रमूठ – शिवसंग्राम आयोजित विद्यार्थी हक्क परिषदेला पुण्यात जोरदार प्रतिसाद
पुणे :
स्पर्धापरीक्षांमधून महाराष्ट्राचे ‘क्रीम आणि ड्रीम’ विद्यार्थी अडीअडणींचा सामना करीत असताना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेषत: राहण्या-खाण्याची सोय करायला महाराष्ट्र सरकारकडे एक कोटी रुपये सुद्धा खर्ची टाकलेले नसणे गंभीर असून, तरुणाईचे सर्व प्रश्न कोणत्याही परिस्थितीत हक्काने सोडविण्यासाठी सरकारकडून सोडविण्याचा निर्धार आज करण्यात आला.
‘शिवसंग्राम विद्यार्थी संघटना’ आयोजित ‘विद्यार्थी हक्क परिषद 2015’चे आयोजन युतीतील घटक पक्षांच्या सहभागाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. या परिषदेला जोरदार प्रतिसाद मिळाला. अध्यक्ष स्थानी शिवसंग्राम चे अध्यक्ष आमदार विनायक मेटे होते
परिषदेला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, घटक पक्षांचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर, सदाभाऊ खोत, अविनाश महातेकर, आमदार भारती लव्हेकर, रविकांत तुपकर उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठीची वयोमर्यादा 40 तर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची वयोमर्यादा 33 करावी, खासगी क्लासेसचा नियंत्रणाचा कायदा आणावा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावर वसतिगृहे सुरू करावीत, शासकीय अधिकार्यांच्या पाल्यांना शासकीय शाळेत पाठवावे, आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा सुरू कराव्यात, इत्यादी मागण्यांचे ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले.
शिवसंग्राम अध्यक्ष आमदार विनायक मेटे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत या मागण्या सरकारकडून मान्य करून घेऊ अन्यथा नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा नेऊ, 20 ऑक्टोबरला या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी औरंगाबाद येथे मेळावा आयोजित करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
राजू शेट्टी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परिषदेने प्रश्न सुटले नाहीत तर रस्त्यावर उतरायची तयारी ठेवावी. साखर सम्राटांविरोधात लढल्यानंतर शिक्षणसम्राटांविरुद्ध लढायची वेळ आली आहे. शिक्षण संस्था धर्मादाय संस्था म्हणून जमिनी लाटल्या; पण गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश दिले नाहीत. त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली पाहिजे.
आमदार महादेव जानकर म्हणाले, ‘आम्ही सत्तेत आहोत की नाही, हे माहीत नाही, पण आम्ही शेतकरी विद्यार्थ्यांबरोबर आहोत. विद्यार्थ्यांनी देखील गरिबीचे भांडवल न करता मोठी स्वप्ने पाहावीत.’
सदाभाऊ खोत म्हणाले, खेड्यातील माणसे व्यवस्थेत जातील तेव्हा शासन व्यवस्थेला दु:ख कळेल. विद्यार्थी हा अंगार आहे, त्याच्या मागण्या मान्य करा, अन्यथा तो राख करेल.
अविनाश महातेकर म्हणाले, ‘सरकारने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून धोरण ठरवावे. ते शिक्षण संस्थांच्या फायद्याचे नसावे.’
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘राज लोकसेवा आयोगाचा कोटा वाढविण्याचा निर्णय लवकरच करू. शासन अभ्यासक्रम आणि गुणवत्ता यात ढवळा ढवळ करणार नाही. वयोमर्यादेचा प्रश्न मंत्रिमंडळात सोडविण्यासाठी आग्रही राहू. खासगी क्लासेसच्या फीचा कायदाही करू. गरीब विद्यार्थ्यांना त्यात आरक्षण देऊ. व्यावहारिक शिक्षण प्रणालीसाठी अभ्यासगट नेमू. मागच्या सरकारला दोष न देता जनहिताची कामे करून दाखवू.
शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शैलेश सरकटे यांनी मागण्या सादर केल्या. 10 रुपयांत विद्यार्थ्यांना जेवण मिळाले पाहिजे असे त्यांनी आग्रहाने सांगितले.’
तुषार काकडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवसंग्राम प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे ,डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. उज्ज्वला हाके, श्रद्धा भातंब्रेकर, दशरथ राऊत,बाळासाहेब दोड्तले इत्यादी उपस्थित होते.