पुणे : कोणत्याही शहराच्या विकासाची नियोजनबद्ध आखणी ही दूरदृष्टीकोनातून व्हावी. किमान शंभर वर्षानंतर भेडसावणाऱ्या समस्यांचा त्यात विचार व्हायला हवा. परंतू आपल्याकडे मात्र याचा प्रकर्षाने अभाव जाणवतो. शहराचा विकास आराखडा तयार करताना केवळ काही वर्षापुरताच विचार केला जातो. या विकास आराखड्यास मंजुरी मिळण्यास होणारी दिरंगाई, लोकप्रतिनिधींची उदासीनता, शासकीय निष्क्रियता या कारणास्तव शहराच्या वाढीच्या तुलनेत तो आराखडा कधीच मागे पडलेला असतो. त्यामुळे औषधांप्रमाणेच विकास आराखड्यासही एक्सपायरी डेट हवी, असे मत प्रसिद्ध व्यावसायिक व डीएसके समूहाचे अध्यक्ष श्री डी. एस. कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले.
मैत्रेय चॅरिटेबल सोसायटी, न्यास यांच्या स्नेहसेवा संस्थेच्या वतीने निवारा आश्रमाच्या सभागृहात श्री. डी. एस. कुलकर्णी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पुणे शहराला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर प्रामुख्याने या मुलाखतीच्या माध्यमातून चर्चा झाली. पायाभूत सुविधांच्या बाबतीत पाश्च्यात्य देशांच्या तुलनेत आपला देश कुठे मागे पडतोय हे अनेक उदाहरणांचे दाखले देत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक नाविण्यपूर्ण उपाय योजनांचेही त्यांनी पर्याय सुचविले. श्री श्याम भुर्के यांनी ही मुलाखत घेतली.
कुलकर्णी म्हणाले की, रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असल्याने पुणे, मुंबई, बंगळूर आणि दिल्ली या शहरांत सर्वाधिक स्थलांतर होते. साहजिकच तेथील पायाभूत सुविधांवर ताण येतो तसेच शहराची अनियोजित वाढ झाल्याने बकालीकरणही वाढते. यामुळे त्या शहराचे संपूर्ण रूपच बदलून जाते. हे चित्र बदलण्यासाठी सखोल व दूरदृष्टीने नियोजन व्हायला हवे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा अशा मूलभूत सुविधांसह किमान १०० किलोमीटरपर्यंत शहराचा विकास व्हावा. महत्वाची शहरे जलवाहतूकीने एकमेकांना जोडली जावीत. सार्वजनिक वाहतूकीत सुधारणा व्हावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याचे शुद्धीकरण व पुर्नवापर करण्यावर भर द्यावा. रहदारी, पार्किंग सारखे प्रश्र्न टाळण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलाव्यात, असे अनेक पर्याय श्री. कुलकर्णी यांनी यावेळी सुचविले. तसेच शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या भागात ट्राम कशी सोयीस्कर व परवडणारी ठरेल, हे देखील त्यांनी पटवून दिले.
एका स्मार्ट शहराचे प्रारूप आम्ही ड्रीम सिटीच्या माध्यमातून सरकारपुढे ठेवत आहोत. संपूर्ण खासगी बळावर उभारण्यात येणार्या प्रकल्पाच्या नव्हे तर या ड्रीम सिटीचा आदर्श घेऊन सरकारने पुणे व इतर शहरांची नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करावी, अशी माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. श्री. सुरेश ताम्हणकर यांनी आभार मानले.