पुणे – सिंहगड रस्ता परिसरातील सहा सोसायट्यांमधील वाहनांना रविवारी पहाटे आग लावल्यामुळे तब्बल 84 दुचाकी आणि सहा मोटारी भस्मसात झाल्या. आगीमुळे तिघेजण जखमी झाले आहेत. रहिवाशांच्या वाहनांबरोबरच सोसायट्यांचे मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाने घटनास्थळी तत्काळ पोचून आग आटोक्यात आणली; परंतु या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीबरोबरच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सी सी टी व्ही फुटेज नुसार पोलिसांनी याप्रकरणातील अज्ञात आरोपीचे छायाचित्र प्रसिध्द केले आहे
संतोष हॉल चौकाजवळ डॉमिनोज पिझ्झाच्या दुकानासमोरील दुचाकींना पहाटे साडेतीन वाजता आग लागल्याचे प्रथम निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दल तत्काळ आले. तेथील आग विझवितानाच सनसिटी रस्त्यावरील सूर्यनगरी सोसायटीच्या पार्किंगमध्येही आग लागल्याची माहिती दलाला मिळाली. या घटनेपाठोपाठ लगेचच सिंहगड पोलिस ठाण्याजवळच असलेल्या स्वामिनारायण सोसायटीच्या “ए‘ आणि “बी‘ विभागामध्येही आग लागल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे एरंडवणा, कोथरूड येथील बंब तत्काळ मागविण्यात आले. त्यानंतर पुन्हा अक्षय ग्लोरी सोसायटीमध्येही आग लागल्याचा दूरध्वनी खणखणला. यादरम्यान पश्चिम बाह्यवळण महामार्गालगतच्या अवधूत आर्केड सोसायटीमध्येही आगीच्या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली.
सर्व ठिकाणी अग्निशामक गाड्या तत्काळ पाठवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे वाहनांबरोबरच सोसायट्यांतर्गत वीजवाहिन्या, जलवाहिन्यांचेही नुकसान झाले. त्यामुळे रहिवाशांचे हाल झाले.
सर्व सोसायट्यांमध्ये 84 दुचाकी आणि सहा मोटारी भस्मसात झाल्या. बहुतांश गाड्यांमधील पेट्रोल काढून त्या पेटवून दिल्या आहेत. सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळवंत काशीद आदी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
वाहने पेटविणाऱ्या माथेफिरूचा शोध जारी …
Date: