लेखक – राहूल पवार
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
महाबळेश्वर तालुका हा सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील टोकावरती निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका आहे. येथील हवामनातील वैविधतेमुळे व जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यास खूप मर्यादा आहेत. अशी परिस्थिती असतानाही महाबळेश्वर तालुक्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणे देऊन वातावरणाशी जुळवून घेऊन कोणती पिकपद्धती अवलंबता येईल याबाबत जागृती करण्याचे काम केले आहे.
अशाच प्रकारचा एक वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण प्रकल्प महाबळेश्वर तालुक्यातील मौजे गोडवली गावामध्ये आत्माच्या मार्गदर्शनाखाली व तालुका कृषी अधिकारी, महाबळेश्वर यांच्या मदतीने अधुनिक पद्धतीने वाटाणा लागवड प्रकल्प सध्या कार्यान्वित आहे. गोडवली या गावामधील शेतकरी पारंपारिक पद्धतीने स्थानिक (आरकेल) उपलब्ध असणाऱ्या वाटाणा वाणीची लागवड करत होते. या वाणातून शेतकऱ्यांना 3 ते 4 तोडे मिळत असे, वाटाण्याच्या शेंगेमध्ये 3-4 दाणेच यायचे पर्यायाने उत्पादन कमी होऊन त्यास जेमतेम दर मिळत होते. यातून शेतकारी आपली कशीबशी उपजीविका करत होते. ही शेतकऱ्यांची परिस्थिती ओळखून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत शेतकऱ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करुन या प्रकल्पामार्फत प्रथमत: शेतकऱ्यांना वाटणा लागवडीच अधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञांच्या मार्फत गोडवली या गावी दिले. त्यातून शेतकऱ्यांना वाटणा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान समजले.
या प्रशिक्षणानंतर गावातील 100 शेतकऱ्यांनी प्रकल्प भाग घेण्यासाठी विनंती केली. त्यानुसार 100 शेतकऱ्यांच्या शेतावरील 50 एकर क्षेत्रावरती वाटाण्याच्या गोल्डन (जीएस-10) या वाणाची 100 प्रात्यक्षिके घेण्याचे ठरविले व त्यानुसार शेतकऱ्यांना आत्मा कार्यालामार्फत 10 किलो वाटाणा बियाणे प्रत्येकी 20 गुंठे क्षेत्रासाठी पिक प्रात्यक्षिक देण्यात आले व त्याची पेरणीही अधुनिक तंत्रज्ञानानुसारच करण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्यांची प्रतिएकरी 10 किलो बियाण्यांची बचत झाली.
या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना एक नाविन्यपूर्ण सहल म्हणून सासवड परिसरातील प्रगतशिल शेतकऱ्यांच्या शेतावरती अभ्यास दौरा काढला. गोल्डन (जीएस-10) या वाणाची निवड करण्याचा उद्देश म्हणजे या वाणामुळे शेतकऱ्यांना 8 ते 9 तोड मिळतात. एका शेंगेमध्ये 10 वाटाणे तयार होत अल्याने पर्यायाने हिरव्या वाटाण्यास बाजारामध्ये मागणी असल्याने व गोल्डन ही जात चवीला गोड असल्याने दर जास्त मिळत आहे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक परस्थिती सुधारण्यास मदत झाली. या प्रकल्पात 100 शेतकरी सहभागी झाले असून 50 एकर क्षेत्रावर वाटाणा लागवड करण्यात आला. या प्रकल्पावर 2 लाख 89 हजार 414 रुपये खर्च करण्यात आला असून अंदाजीत 150 टन उत्पादन मिळाले आहे.
अधुनिक पद्धतीने वाटाणा लागवड प्रकल्पांतर्गत उत्पादित झालेला सर्व शेतकऱ्यांचा वाटाणा हा प्रकल्पात सहभागी झालेले शेतकरी स्वत: थेट भाजीपाला विक्री या आत्माच्या योजनेतून विक्री करतात.
अशा प्रकारे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये व्यवसायीकतेची भावना निर्माण झाली असून सध्या तेथील शेतकरी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत आहेत.